अत्यावश्यक नैसर्गिक संपदा वाचवणे गरजेचे : डॉ. मोरवंचीकर

छत्रपती संभाजी नगर २६ डिसेंबर २०२३ : समृध्द मानवी जीवनासाठी नैसर्गिक साधन संपत्ती अत्यंत महत्वाची आहे. ज्या गोष्टी निर्माण करता येत नाहीत त्या वाचवणे गरजेचे आहे. विशेषतः पाणी ही अत्यावश्यक नैसर्गिक संपदा असून ती निर्माण करता येत नाही. म्हणून पाणी वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी योगदान दिले पाहिजे. मी केलेल्या भारतीय जलसंस्कृतीच्या अभ्यासाची दखल घेऊन महाराष्ट्र विकास केंद्राने जलमित्र पुरस्कार देऊन माझा सन्मान केला. माझ्यासाठी हा पुरस्कार अनमोल आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील जानकी एक्झिक्युटीव्ह सभागृहात आयोजित सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना डॉ. मोरवंचीकर बोलत होते. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांच्या हस्ते व पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानचे प्रमुख ह.भ.प. रावसाहेब महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी निवृत्त सनदी अधिकारी नरेश गीते, नाशिकच्या गोदामाई सेवा ट्रस्टचे अध्यक्ष देवांग जानी, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, जलमित्र निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार व जलक्षेत्रातील अनेक अभ्यासक व जलप्रेमी उपस्थित होते.

डॉ. मोरवंचीकर म्हणाले, समाजातील सर्व स्तरांवर चर्चा घडवून लोकांमध्ये पाण्याविषयी संवेदनशीलता निर्माण करणे गरजेचे आहे. जे शिक्षित आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी, पाण्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र आपला अनुभव तितकासा चांगला नाही. अशावेळी जलक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विकास केंद्र राबवित असलेले उपक्रम स्तुत्य व अभिनंदनीय असल्याचे मोरवंचीकर यांनी स्पष्ट केले.

डॉ. मोरवंचीकरांनी केलेले काम हे एखाद्या तपस्वी साधकासारखे आहे. त्यांना सन्मानीत करण्याचे भाग्य लाभले हा माझा सन्मान आहे असे सांगून डॉ. दि. मा. मोरे यांनी डॉ. मोरवंचीकरांचे कार्य भविष्यातील समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. या वेळी बोलताना ह. भ. प. रावसाहेब महाराज म्हणाले की, पाणी हेच जीवन मानणाऱ्या व पाण्याच्या क्षेत्रातील ऐतिहासिक भारतीय जल संस्कृतीची अभ्यासपूर्ण मांडणी जागतिक व्यासपीठावर करणाऱ्या डॉ. मोरवंचीकरांचे कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेले काम राष्ट्राला व जनतेला सतत प्रेरणा देत राहील. डॉ. मोरवंचीकरांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा सत्कार हा संपूर्ण मराठवाड्याचा सन्मान आहे असे सांगून नरेश गीते यांनी महाराष्ट्र विकास केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक केले. मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी महाराष्ट्र विकास केंद्राने पुढाकार घ्यावा, त्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गीते यांनी दिले. यावेळी देवांग जानी यांनी आपल्या भाषणात गोदावरी नदीपात्रातील नाशिक येथील सिमेंटीकरणाचे तोटे सांगून कायदेशीर लढा देत ते हटवल्याचे सांगितले. नद्या व नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहन करून डॅा.मोरवंचीकर यांचे कार्य त्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे प्रेरक राहील असे नमुद केले.

सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व रोख दहा हजार रुपये देऊन डॉ. मोरवंचीकरांना जलमित्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. डॉ. मोरवंचीकरांनी रोख रक्कम संस्थेला परत देऊन पाणी चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी उपयोगात आणावी असे सांगितले. कार्यक्रमास विविध जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे जल अभ्यासक, संभाजीनगर येथील उद्योग, शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा उद्योजक मनोज कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. मनोज कदम यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा