कोरोनाच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे: प्रविण माने 

इंदापूर, दि. ८ जुलै २०२०: संपूर्ण जगाचे जीवनमान अस्ताव्यस्त करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या इंदापूरातही  चांगलाच वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांतून हा संसर्ग मोठ्या प्रमाणवर झाला असून, ही परीस्थिती चिंतादायक होत चालली आहे. 

पुणे- मुंबईहुन आपल्या मूळ गावी आलेल्या नागरिकांच्या विलगीकरणातील काही त्रुटींमुळे असेन किंवा तालुक्यातील माणूस बाहेर कुणाच्या संपर्कात आल्याने असेन, इतर ठिकाणासारखेच कोरोनाचे हे संकट आपल्यावर अधिक गडद होते आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपल्या इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठीच्या, व्हिटॅमिन सी आणि डि व्हिटॅमिनच्या गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आज  जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रविण माने यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

नुकताच आपल्या भागात ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, या पार्श्वभूमीवर बिजवडी- पळसदेव गटातील ज्येष्ठांसाठी, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी या गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत ११००० (अकरा हजार) गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची असून यासाठी  सर्व माता – भगिनी व वडिलधाऱ्यांनी जागरूकता बाळगून, सरकारने जाहीर केलेल्या आचारसंहितेचं पालन करणे आवश्यक असल्याचे मत माने यांनी यावेळी व्यक्त केले.

 प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विस्तार अधिकारी जगताप, मेडिकल ऑफिसर डॉ चंदनशिवे मॅडम, प्रतिभा गाडे मॅडम, डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा