मुंबई, १६ मार्च २०२३: महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी अवकाळी पावसानं कहर सुरू केलाय. या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कालही महाराष्ट्रातील ८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. आज (१६ मार्च, गुरुवार) भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मुंबई-ठाणे-पुणेसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
मुंबई IMD ने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. पुढील ३ ते ४ तासांत संपूर्ण उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील हवामान तज्ज्ञांनी गुरुवारी आणि शुक्रवारी म्हणजेच आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. अशाप्रकारे मार्च महिन्यात पहिल्यांदाच पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्याची वेळ आलीय. भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
ज्या १३ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे. अशी माहिती हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. या जिल्ह्यांमध्ये दिवसभर पावसाचा अंदाज व्यक्त करत त्यांनी सर्वसामान्यांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय.
आज सकाळपासून मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झालीय. मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली परिसरात रात्रीपासूनच पाऊस झाला. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागातही सकाळपासून पाऊस पडत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड