पुणे, २३ मार्च २०२३: महाराष्ट्रात यंदा संपूर्ण मार्च महिना पावसाचा महिना बनलाय. सुरुवातीपासूनच अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त केली आहेत. आता पुन्हा भारतीय हवामान विभागाचे (IMD) तज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी ट्विट करून शेतकऱ्यांची चिंता वाढवलीय. हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांच्या मते, उद्यापासून (२४ मार्च, शुक्रवार) मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे, नाशिक, नंदुरबारसह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापुरातही पाऊस पडू शकतो. याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसणार आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही स्थिती कायम राहिली. भारतीय हवामान खात्यानं पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळं शेतकऱ्यांचं संकट काही संपताना दिसत नाही. अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचा पंचनामा कधी होईल याची आत्तापर्यंत शेतकरी वाट पाहत आहेत. नुकसान भरपाई मिळणं अजून खूप दूर आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं हवामानात झपाट्यानं बदल होत आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सकाळी दमट आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस पडंल. अवकाळी पावसाचं संकट महाराष्ट्रातील विदर्भात सर्वाधिक आहे. त्यातील काही भागांत पुढील आठ दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दुसरीकडं पावसानं झालेल्या नुकसानीचा पंचनामा न झाल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहे.
नाशिक जिल्ह्यात १५ ते १९ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळं ८०७९ हेक्टरवरील पिकं खराब झाली. जिल्ह्यातील ४३७ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळं सुमारे २१ हजार ७५० शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. नांदगाव, पेठ, निफाड, कळवण या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. नुकसानीची लवकरात लवकर भरपाई व्हावी यासाठी लवकरात लवकर पंचनामा करण्यात यावा, अशी विनंती शेतकरी करत आहेत. पुण्यातील भोर तालुक्यात पावसात भिजल्यानं गहू खराब होऊ नये म्हणून शेतकरी घाईघाईनं गव्हाची काढणी करत आहेत. सरकारनं लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरून काढावं, अशी आता शेतकऱ्यांची ओरड आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड