सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा महावितरणला आमरण उपोषणाचा इशारा

बारामती, १ जानेवारी २०२१: बारामती ग्रामीण मंडळ ऊर्जा भवन बारामती येथील कार्यालयातून नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना परिपत्रका प्रमाणे शासनाने दिलेल्या पन्नास टक्के राखीव कामे मिळत नसल्याने बिंटू बाबासो कोकरे व अविनाश मारुती चांदगुडे या ठेकेदार अभियंत्यांनी ३० डिसेंबरला पत्र देऊन ३ जानेवारी पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही ५ जानेवारी पासून ऊर्जा भवन येथे आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्याकडे दिले आहे.

शासनाच्या दिलेल्या २०१५ – १६ पासून जाहीर केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास ठेकेदार म्हणून नोंद करण्यात आली आहे. या परिपत्रकाप्रमाणे त्यांना पन्नास टक्के कामे देणे आवश्यक आहे. मात्र, महावितरण कडून नावाला दोन ते तीन टक्के कामे दिली गेली आहेत. अनेक वेळा कार्यालयाशी संपर्क साधुन मात्र येथे कोणती दखल घेतली जात नाही त्यामुळे बेरोजगार अभियंत्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

अभियंत्यांकडे दिलेल्या पत्रात केलेल्या मागणी प्रमाणे येथील अधीक्षक अभियंता यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना परिपत्रकाप्रमाणे पन्नास टक्के काम न देता आर्थिक संगनमताने ही कामे दुसऱ्या ठेकेदारांना दिली आहेत त्यांचे निलंबन करण्यात यावे तसेच कार्यालयात विचारपूस करायला गेलो असता आम्हला तुमची गरज नाही असे अपमानास्पद बोलले जाते, एम्पलमेंट टेंडर मध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अभियंत्यांना शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे पन्नास टक्के कामे मिळावी, तर अभियंत्यांना चालू ऑर्डर प्रमाणे कामे मिळावीत अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता ठेकेदार संघटना बारामती परिमंडळ यांच्या वतीने करण्यात आली असून काही ठेकेदारांना एक ते दीड वर्षात पन्नास लाख पर्यंतची कामे आर्थिक तडजोड करून दिली असल्याची तक्रार देण्यात आली आहे. तसे पत्र अधीक्षक अभियंता पाटील यांच्याकडे दिले असल्याचे कोकरे यांनी सांगितले.

पाच वर्षात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ४.८२ लाख रुपयांची कामे दिली आहेत.तर १२ जानेवारीला ५० लाख रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने वाटप केले जाणार आहे. काम देताना त्या ठेकेदाराचा अनुभव, मनुष्यबळ, या सर्व गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. त्यामुळे काम देताना त्यांचा पूर्व अनुभव देखील बघितला जातो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा