काय आहेत डिजिटल रुपयाचे फायदे आणि तोटे? रोख ठेवण्याची गरज नाही, पण…

17

पुणे, २ नोव्हेंबर २०२२: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने त्यांचं डिजिटल चलन ई-रुपी’चं पायलट लॉन्च केलंय. आता या पायलट प्रोजेक्टची व्याप्ती जसजशी पुढं जाईल तसतशी सेंट्रल बँक CBDC शी संबंधित नवीन वैशिष्ट्यं आणि फायदे लोकांशी शेअर करंल. हा डिजिटल रुपया देशात कायदेशीर निविदा म्हणून जारी करण्यात आला. त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

एक महिन्याचा पायलट प्रोजेक्ट

सर्वप्रथम, मंगळवारपासून सुरू झालेला डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट जवळपास महिनाभर चालणार आहे. सध्या, ते होलसेल ट्रांजेक्शन आणि क्रॉस-बॉर्डर पेमेंटसाठी वापरलं जाईल. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील ९ बँका याला जोडण्यात आल्यात. तथापि, या पायलट लॉन्चिंग अंतर्गत, काही निवडक लोकांनाच व्यवहार करण्याची परवानगी असंल.

E-Rupee चे हे मोठे फायदे

• डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत.
• लोकांना खिशात रोख रक्कम ठेवण्याची गरज भासणार नाही.
• मोबाईल वॉलेटप्रमाणं यात पेमेंट करण्याची सुविधा असंल.
• तुम्ही डिजीटल रुपयाचं बँक मनी आणि कॅश मध्ये सहज रुपांतर करू शकाल.
• परदेशात पैसे पाठवण्याचा खर्च कमी होईल.
• इंटरनेट कनेक्शन नसतानाही E-Rupee काम करेल.
• ई-रुपयाचं मूल्य सध्याच्या चलनाच्या बरोबरीचं असंल.

Digital Rupeeचे काही तोटे

जर आपण रिझर्व्ह बँकेच्या (RBI) डिजिटल चलनाच्या E-Rupeeच्या नुकसानाबद्दल बोललो, तर त्याचा एक मोठा तोटा असा होऊ शकतो की ते पैशाच्या व्यवहारांशी संबंधित गोपनीयता ठेवणार नाही. सहसा रोखीनं व्यवहार करून ओळख गुप्त ठेवली जाते. मात्र डिजिटल व्यवहार सरकारच्या देखरेखीखालीच राहतील. अशा परिस्थितीत, काही लोकांसाठी ते समस्या बनू शकते.

याशिवाय E-Rupeeवर कोणतेही व्याज मिळणार नाही. याचं कारणही आरबीआयनं दिलंय. मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, जर डिजिटल रुपयावर व्याज दिले गेले तर ते चलन बाजारात अस्थिरता आणू शकते. कारण अशा परिस्थितीत लोक त्यांच्या बचत खात्यातून पैसे काढू लागतील आणि ते डिजिटल चलनात रूपांतरित करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे