What did Prime Minister Modi say in 22 minutes on the Sindoor campaign:भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. काल १२ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदी लाईव्ह आले होते. त्यांनी यावेळी एकूण २२ मिनिटे भाषण केले. या भाषणाने जगाचे लक्ष वेधले.
त्यांच्या संपूर्ण भाषणावर एक नजर टाकूया…
१. आपण सगळ्यांनी देशाचं सामर्थ्य आणि संयम या दोन्ही गोष्टी गेल्या काही दिवसांत पाहिल्या आहेत. मी सगळ्यात आधी भारतीय लष्कर, गुप्तहेर खातं, या सगळ्यांना प्रत्येक भारतीयातर्फे सलाम करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य साध्य करण्यासाठी असीम शौर्य गाजवलं. मी त्यांचं साहस, त्यांच्या पराक्रमाला आज आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला, बहिणीला आणि मुलीला समर्पित करतो.
२. २२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जी क्रूरता दाखवली, त्यामुळे अवघ्या जगाला धक्का बसला. सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेल्या निर्दोष नागरिकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबीयांसमोर, मुलांसमोर निर्दयीपणे ठार करणं हा दहशतवादाचा अत्यंत बीभत्स चेहरा होता. क्रूरता होती. देशाच्या भावनेला तोडण्याचा निंदनीय प्रयत्न होता. माझ्यासाठी ही वैयक्तिक पातळीवर प्रचंड वेदनादायी बाब होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, समाज, वर्ग, राजकीय पक्ष एकमताने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा ठाकला.
३. आपण दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवाद्यांची प्रत्येक संघटना जाणून आहे, की आपल्या माता भगिनीच्या कपाळावरून कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाहीये. हे देशातल्या कोट्यवधि लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.
४. ६ मे रोजी मध्यरात्री आणि ७ मे च्या पहाटे अवघ्या जगानं या प्रतिज्ञेचं मूर्त रूप पाहिलं. भारतीय लष्करानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर, त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्लाबोल केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकेल. पण जेव्हा देश एकत्र उभा राहतो, देश प्रथम या भावनेने प्रेरित झालेला असतो, तेव्हा असे सक्षम निर्णय घेतले जातात. ते साध्य करून दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानात दहशतवादी तळांवर भारतीय क्षेपणास्त्रांनी, ड्रोन्सने हल्ला झाला, तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नाही, तर त्यांचा धीरही डळमळीत झाला.
५. बहावलपूर आणि मुरीदकेसारखे दहशतवादी तळ जागतिक दहशतवादाचे विद्यापीठ ठरले आहेत. जगभरातल्या मोठमोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे याच ठिकाणांशी जोडले गेले. दहशतवाद्यांनी आपल्या भगिनींचं कुंकू पुसलं होतं. त्यामुळेच भारतानं दहशतीची ही मुख्यालयं उद्ध्वस्त केली. या कारवाईत १०० हून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. दहशतवाद्यांचे खूप सारे म्होरके खुलेआम पाकिस्तानात फिरत होते. भारताविरोधात कारवाया करत होते. त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं.
६. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या गर्तेत गेला होता. गडबडला होता. याच गोंधळात त्यानं आणखी एक चूक केली. दहशतवादविरोधी कारवाईत भारताची मदत करण्याऐवजी भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्ताननं आपल्या शाळा, कॉलेज, गुरुद्वारे, मंदिरं, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तान स्वत: उघडा पडला. जगानं पाहिलं की कशा प्रकारे पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रं भारतासमोर निष्प्रभ झाले. भारताच्या सक्षम एअर डिफेन्स सिस्टीमनं त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं. पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती. पण भारतानं पाकिस्तानच्या छातीवरच वार केला.
७. भारताचे ड्रोन, क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केला. पाकिस्तानी वायूदलाच्या तळांना लक्ष्य केलं. या तळांवर पाकिस्तानला मोठा गर्व होता. भारतानं पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला एवढं उद्ध्वस्त केलं, ज्याचा अंदाज पाकिस्तानलाही नव्हता. त्यामुळे भारताच्या आक्रमक मोहिमेनंतर पाकिस्तान वाचण्याचे मार्ग शोधू लागला. पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी देशांकडे साकडं घालू लागला. सगळीकडे अपयशी ठरल्यानंतर नाईलाजाने १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी लष्करानं आपल्या डीजीएमओंना संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवादी व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केलं होतं. दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.
८. पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवादी तळांना आपण उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानकडून जेव्हा हे म्हटलं गेलं की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई किंवा लष्करी कारवाई केली जाणार नाही. तेव्हा भारतानंही त्यावर विचार केला. मी पुन्हा सांगतो, आपण पाकिस्तानच्या दहशतवादी व लष्करी तळांवरील आपली कारवाई फक्त स्थगित केली आहे. येत्या काही दिवसांत आपण पाकिस्तानच्या हालचाली या निकषांवर पाहू की ते काय पाऊल उचलतात. भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी, एअर फोर्स, आर्मी आणि नौदलानं, आपली बीएसएफ, निमलष्करी दल सातत्याने सतर्क आहेत.
९. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हेच दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादविरोधातील लढ्यात एक नवी रेषा, नवी पद्धत निश्चित केली आहे.
१०. पहिला – भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आपल्या पद्धतीने, आपल्या अटींवर उत्तर देणारच. त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई केली जाईल, जिथे दहशतवादाची मुळं आहेत.
११. दुसरा – कोणतंही आण्विक ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. त्याचा आधार घेऊन वाढणाऱ्या दहशतवादावर भारत घातक हल्ला करणार.
१२. तिसरा – आपण दहशतवाद्यांचे सरकार आणि दहशतवाद्यांचे म्होरके यांना वेगळे मानणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगानं पाकिस्तानचं ते निंदनीय सत्य पाहिलं आहे, जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे मोठमोठे अधिकारी उपस्थित होते. राज्य पुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे.
१३. आपण भारत आणि भारतीय नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नव्या पद्धतीला सुरुवात केली आहे. आपण वाळवंट व डोंगराळ भागात आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्याचबरोबर न्यू एज वॉरफेअरमध्ये आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. या मोहिमेत आपल्या भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची क्षमता सिद्ध झाली आहे.
१४. आज जग पाहात आहे की २१ व्या शतकातील युद्धनीतीत भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची वेळ आली आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपल्या सगळ्यांचं एकत्र राहणं, आपली एकता आपली सर्वात मोठी शक्ती आहे. नक्कीच हे युग युद्धाचं नाही. पण हे युग दहशतवादाचंही नाही.
१५. पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तान सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी देत आहेत, ते एक दिवस पाकिस्तानलाच नष्ट करून टाकेल. पाकिस्तानला जर वाचायचं असेल तर त्याला दहशतवाद नष्ट करावाच लागेल. त्याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही. भारताचा हेतू एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही. शिवाय पाणी आणि रक्तही एकत्र नाही वाहू शकत.
१६. मी आज जागतिक समूहालाही सांगेन, आमचं हे धोरण राहिलं आहे. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल, तर दहशतवादावरच होईल, पाकव्याप्त काश्मीरवरच होईल.
१७. प्रिय देशवासी, आज बुद्ध पौर्णिमा आहे. त्यांनी आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. पण तो मार्गही शक्तीच्या माध्यमातून जातो. मानवता शांती आणि समृद्धीच्या दिशेनं जावी, प्रत्येक भारतीय शांतीने जगू शकेल, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू शकेल यासाठी भारताचं शक्तिशाली असणं फार गरजेचं आहे. गरज पडल्यास या शक्तीचा वापर करणंही गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांत भारतानं हेच केलं आहे.
१८. मी पुन्हा एकदा भारतीय लष्कर व निमलष्करी दलाला सलाम करतो. आपण भारतीयांच्या एकतेच्या संकल्पाला नमन करतो.
धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.
न्युज अनकट प्रतिनिधी – ऐश्वर्या शिलवंत