श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश ९ जुलै २०२३ :
भारत आता पुन्हा चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालाय. येत्या १४ जुलैला ‘चांद्रयान-३’ अवकाशात झेपावेल असं इस्रोनं जाहीर केलय. पण नक्की काय आहे हे ‘चांद्रयान-३’ मिशन आपण जाणून घेऊयात.
‘चांद्रयान-३’ मिशन काय आहे?
अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आपल्या देशाने अनेक महत्वाच्या मोहीमा राबविल्या आहेत. भारताने ‘चांद्रयान-१’ मोहीमेत यश प्राप्त झाल्यानंतर, आपली ‘चांद्रयान-२’ मोहीम ६ सप्टेंबर २०१९ ला राबवली होती, पण तांत्रिक बिघाड म्हणजेच काही टेक्नीकल फाॅल्ट मुळे ह्या ‘चांद्रयान- २’ मोहीमेत भारत देश अपयशी ठरला. मात्र त्यानंतर इस्रोने नियोजित ‘चांद्रयान-३’ मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. १४ जुलैला ही अंतराळ मोहीम प्रक्षेपित होणार असून चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल. इस्रोच्या अधिकार्यांच्या मते, चांद्रयान-३ मोहीम, ही चांद्रयान-२ चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल. हे ‘चांद्रयान-२’ सारखे दिसेल, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असेल. ‘चांद्रयान-३’ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे.
‘चांद्रयान-३’ कधी लाॅच करण्यात येणार आहे?
आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरमधून हे यान अवकाशात झेपावेल. १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ चे मार्क-३ च्या माध्यमातून प्रक्षेपण अंतराळात करण्यात येणार आहे.
‘चांद्रयान-३’ मिशनचा प्रमुख हेतु काय असणार आहे?
‘चांद्रयान-३’ हे चंद्राच्या पृथ्वीपासूनच्या सर्वाधिक दूर असलेल्या भागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं, तर भारत हा जगातील चौथा देश बनेल. ‘चांद्रयान-२’ मोहिमेतही भारतानं यान चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण विक्रम लँडर अलगद उतरण्याऐवजी चंद्रावर कोसळला होता. त्या अपयशातून धडा घेत ‘चांद्रयान-३’ मध्ये बदल करण्यात आले आहेत.
‘चांद्रयान ३’ चंद्रावर काय करणार आहे?
‘चांद्रयान ३’ प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक आणि नैसर्गिक द्रव्यं, माती, पाण्याचे अंश यांचा अभ्यास करून चंद्राविषयीच्या आपल्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न ही मोहीम करेल.
न्युज अनकट प्रतिनिधी : आचल सूर्यवंशी