दिवाळी
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभीत केले जाते.पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात.हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान येत असतो.या सणाला भारतात बहुतेक ठिकाणी सुटी असते.
दिवाळीतील पणत्यांची आरास
प्राचीनत्व
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसात.पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते.प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा,कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात.
महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात.त्यावर मातीची खेळणी मांडतात.धान्य पेरतात.यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.
दीपावलीची विविध नावे
दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराणया ग्रंथात या सणास “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला “दीपप्रतिपदुत्सव” असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” हा शब्द वापरला आहे.भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दीपालिका” म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख “सुखरात्रि” असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका” म्हणून दिवाळी ओळखली जाते.
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते याप्रमाणे-
वसुबारस पूजा
[आश्विन कृष्ण द्वादशी]स, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे,वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून पुजा करतात.
धनत्रयोदशी
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे.कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो.आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मीप्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृतने भरलेला असतो असे म्हटले आहे.
या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.
हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
जैन धर्मीय कशी साजरी करतात दिवाळी
जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचावध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०८ स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्वव मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०८ कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.
नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.
लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणीविकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्रयदूर होते असे मानले जाते.
प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.
अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.
भारतातील विविध समाजांची दिवाळी
जैन समाज :
आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना ‘निर्वाण लाडूं’चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.
आंध्रातील तेलुगू समाज :
ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.
बंगाली समाज :
दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.
बौद्ध समाज :
गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
तमिळ समाज :
प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
महाराष्ट्रातील मराठी समाज :
लक्ष्मी पूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे ही यांची दिवाळी. ती रमा एकादशीपासून (आश्विन कृष्ण एकादशीपासून) सुरू होते. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल-वात घालून उजळवलेली पणती ठेवतात. दुसरा दिवस वसू बारस. या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. घराबाहेर रांगोळी काढतात. आकाशकंदील लावतात. घरात गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असतो. तिसरा दिवस धन त्रयोदशी. ज्या बायकांनी आधीपासूनच दिवाळीचा फराळ, म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेव-चकली-चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर ती करून काम लवकरात लवकर संपवतात. ज्या घरात फार माणसे असतील त्या घरातील स्त्रिया या दिवशी ‘बायकांची न्हाणी’ उरकून घेतात. चौथा दिवस – नरक चतुर्दशी. अगदी पहाटे उठून आधल्या दिवशी स्वच्छ केलेल्या संडासात पणती ठेवतात. पहाटेच घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषत: पुरुषांचे, सूर्योदयापूर्वीच तेल उटणे लावून अभ्यंगस्नान होते. लोक आंघोळ करत असताना फुलबाज्या लावतात आणि फटाके फोडतात. नंतर सर्वजण फोडणीचे किंवा दडपे पोहे खातात. दिवाळीचा फराळ खाणे येता जाता चालूच असते. शेजारा-पाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. त्यांच्याकडूनही ताटे येतात. ज्यांच्या घरात काही अशुभ घडल्याने दिवाळी नसते त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा होते. ही पूजा घरातला कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी, काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात. त्यांचीही पूजा होते. प्रसादासाठी लाह्या-बत्तासे-डाळिंबाचे दाणे एकत्र करून एका तबकात ठेवलेले असतात. घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अनरसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात. पुढचा दिवस दिवाळीच्या पाडव्याचा. जेवणाचा बेत श्रीखंडपुरी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी. या दिवशी स्त्रिया नवरा, दीर, सासरे आदींना ओवाळतात. नंतरचा दिवस भाऊबीजेचा. यासाठी भाऊ बहिणींच्या घरी जाऊन फराळ करतात किंवा जेवतात आणि ओवाळून घेतात. घराबाहेर पणत्या लावायचा आणि फटाके उडवण्याचा हा दिवाळीतला शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात.
केरळमधील मल्याळी समाज :
दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.
पंजाबातील शीख समाज :
शीखांच्या ६व्या गुरूंना जहांगीर बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस ‘दाता बंदी छोड दिवस’ म्हणून साजरा करतात.
सिंधी समाज :
पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्षमीची पूजा करून घराच्या दरवाज्यांत दिवे लावतात.
विविध ठिकाणातील दिवाळी
मेळघाट
मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज.
राजस्थान
राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर ‘घुड्ल्या’ घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात.प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसर्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.
पंजाब
पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.सहावे गुरु हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.
हरियाणा
दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.
नेपाळ
नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.
गोवा
गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते
दक्षिण भारत
दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.
जागतिक स्वरूप
या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.
भारत,गयाना,त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.
तर हि आहे संपूर्ण दिवाळीची माहिती न्युज अनकटच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

