काय ती थंडी… काय ते धुकं; शिमला नव्हे, हे तर आपलं धुळं अन् जळगाव…

पुणे, १२ जानेवारी २०२३ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने थंडी वाढली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचा पारा १५ अंशाच्या खाली आल्याने बोचऱ्या थंडीचा अनुभव नागरिक अनुभवत आहेत.

तसेच थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढचे आठ दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबई आणि पुण्यातही थंडी वाढली आहे.

मागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई; तसेच कोकणात थंडी वाढली आहे. विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत; तसेच परभणी, गोंदिया, अकोला, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही थंडीचा कडका कायम आहे.

पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतही किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांत सकाळी दाट धुके पडणार आहे; तसेच पुढील आठ ते दहा दिवस थंडीची लाट राहणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम असून, पुढील आठ ते दहा दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे. किमान तापमानात थोडासा चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी राज्यात जळगाव शहराचे तापमान नीचांकी नोंदले असून, तेथे तापमानाचा पारा ७.५ अंशांवर पोचला आहे. पुण्यातील किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस होते.

राज्यात कडाक्याची थंडी पडली असून पुढील दोन ते तीन दिवसांनंतर पारा आणखी घसरण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गोंदिया, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी ५ ते ६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर वाढती थंडी काही पिकांसाठी फायद्याची ठरते आहे. वाढती थंडी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास यंदा गव्हाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आज गुरुवारीही (ता. १२ जानेवारी) राज्यात थंडीचा जोर कायम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान १० ते १५ अंशांच्या असापास आहे. तर काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला असून, थंडीची लाट कायम आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

पाहा राज्यातील विविध जिल्ह्यांतील तापमान (अंश सेल्सिअस)

सोलापूर : १४ अंश सेल्सिअस
सातारा : १०.८
नाशिक : ९.२
नांदेड : १२.४
कोल्हापूर : १४.९
जळगाव : ७
औरंगाबाद : ९.४
रत्नागिरी : १५.५
मुंबई (कुलाबा) : १९.४
पुणे : ८.३
उस्मानाबाद : १०.४
परभणी : १२.५
नंदूरबार : ११.१
अहमदनगर : १०.५
अमरावती : १०
अकोला : १२
बुलढाणा : १४
चंद्रपूर : १३
गडचिरोली : ११
नागपूर : ११
यवतमाळल : ११
वर्धा : ११

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा