पुणे, 18 जून 2022: यंदाच्या राज्यसभा निवडणुकीमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली होती. तसंच चित्र विधान परिषद निवडणुकीत देखील पाहायला मिळत आहे. महा विकास आघाडी आणि भाजप यांच्यात कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. शिवसेनेला या जागेविषयी चिंता लागून होती. आता तिच चिंता काँग्रेसला लागलेली दिसत आहे. काँग्रेसने भाई जगताप यांना अतिरिक्त उमेदवारी दिली असली तरी त्यांना 10 मतांची गरज आहे. तर दुसरीकडं भाजपने प्रसाद लाड यांना सहावा उमेदवार म्हणून घोषित केलंय. यामुळं आता काँग्रेसला भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
काँग्रेसची वाढलेली ही चिंता पाहता आता काँग्रेसने महा विकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला शिवसेनेच्याच आमदारांना फोन करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं राज्य सभेनंतर पुन्हा एकदा महा विकास आघाडी मध्ये संघर्ष पहायला मिळतोय.
निवडून येण्यास किती मतांची आवश्यकता
विधान परिषद निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येकी 27 मतांची आवश्यकता आहे.
शिवसेनेकडं पुरेसं संख्याबळ
तसं जर बघितलं तर महा विकास आघाडी मध्ये शिवसेना आपले दोन आमदार सहजपणे निवडून आणू शकते. कारण शिवसेनेचे संख्याबळ 55 आहे. त्याव्यतिरिक्त शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत. शिवसेनेने आमषा पाडवी आणि सचिन अहिर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र असं असलं तरी शिवसेनेला असलेल्या अतिरिक्त आमदारांच्या पाठिंब्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून धोका असू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसही चिंतेत
राज्यसभा निवडणुकी प्रमाणंच विधान परिषद निवडणुकीमध्ये देखिल अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. शुक्रवारी न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता पुन्हा वाढलेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ 53 आहे. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळं हे संख्याबळ 51 वर आलंय. राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येण्यासाठी 54 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळं उर्वरित मतांची राष्ट्रवादीला जुळवाजुळव करावी लागणार आहे. राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तसं जर बघितलं तर संजय मामा शिंदे, राजेंद्र येड्रावकर, देवेंद्र भुयार यांच्यासह काही जण अजित पवारांच्या संपर्कात असल्याने, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येण्यातही अडचण दिसत नाहीये. मात्र एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. भाजपाने अशी काही खेळी केली तर राष्ट्रवादीची नाचक्की होईल, त्यामुळेच अजित पवारांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याचे मानण्यात येते आहे.
काँग्रेससमोर एक जागा वाचवण्याचं आव्हान
उमेदवार निवडून येण्यासाठी कमीत कमी 27 मतांची आवश्यकता आहे. मात्र काँग्रेस जवळ केवळ 44 मतं आहेत. काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यानुसार काँग्रेसला आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 54 मतांची आवश्यकता आहे. यामुळं काँग्रेसला आणखीन दहा मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. एकंदरीतच काँग्रेससमोर आपली एक जागा वाचवण्यासाठी मोठं आव्हान उभं आहे. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप असे दोन उमेदवार दिले आहेत. एमआयएमचे एक मत आता हंडोरेंना नक्की झआले आहे, मात्र अजून एका मताचा निर्णय एमआयएमने घेतलेला नाही. त्यामुळे अजून काँग्रेसला 9 मते हवी आहेत. या नऊ मतांसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे शिवसेनेच्या आणि भाजपा समर्थित आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. सपाचे दोन आमदार, बविआची दोन किंवा तीन मते आणि अपक्षांची काही मते यावर काँग्रेसच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे.
भाजपकडून 5 उमेदवार
राज्यसभा निवडणुकीत भाजपने मतांच्या जुळवाजुळवीत यश मिळवलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे महाडिक यांचा विजय. हे पाहता विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. यावेळीही भाजपला अतिरिक्त मतांची गरज आहे. या मतांची जुळवाजुळवी करण्यात भाजप किती यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपाने उमा खापरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे या पाच जणांना रिंगणात उरवले आहे. भाजपच्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजपचे एकूण 106 आमदार आहेत, तर 7 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. म्हणजेच त्यांचं संख्याबळ आहे 113. प्रत्यक्षात विजयासाठी भाजपाला गरज आहे 135 मतांची. म्हणजे संख्याबळानुसार भाजपाला 22 जादा मतांची गरज आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मिळून 123 मते पडली होती. हा आकडा स्थिर राहील असा विचार केला तरी, 12 मते भाजपाला जास्त हवी आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे