काय आहे ऋषिगंगा वीज प्रकल्प, ज्याचे चमोलीच्या दुर्घटनेत झाले नुकसान

चमोली, ८ फेब्रुवरी २०२१: नंदादेवी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावणाऱ्या ऋषी गंगेच्या वरच्या पाणलोट क्षेत्रातील तुटलेल्या हिमनगाने पुर आला आहे आणि यामुळे धौली गंगा खोऱ्यातील आणि अलक नंदा नदीच्या खोऱ्यात नदीने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. यामुळे ऋषिगांगा व धौली गंगा यांच्या संगमावर राणी गावाजवळील एका खासगी कंपनीच्या ऋषिगंगा वीज प्रकल्पाला फटका बसला आहे.
 ऋषिगंगा विद्युत प्रकल्प हा एक खासगी प्रकल्प असून वीज निर्मितीसाठी चालविला जात आहे. या प्रकल्पाबद्दल बर्‍याच दिवसांपासून वाद होता. तथापि, येथे वीज निर्मितीस प्रारंभ झाला. येथे पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. हा प्रकल्प ऋषी गंगा नदीवर बांधला गेला आहे आणि ही नदी धौली गंगेला जाऊन मिळते.
 उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात रविवारी हीमनग (ग्लेशियर) तुटल्याने धौलीगंगा नदीला पूर आला आहे.  यामुळे ऋषिगंगा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, वीज प्रकल्पात काम करणारे १५० कामगार बेपत्ता आहेत.
 ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्प प्रामुख्याने राणी गावात चालविला जात आहे. यातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्याचे उद्दीष्ट आहे, जेणेकरून उत्तराखंडसह इतर राज्यांना वीज पुरवता येईल. या क्षणी या प्रकल्पाचे किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
 उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील ऋषिगंगा खोऱ्यात रविवारी हिमखंड तुटल्यामुळे अलकनंदा व तेथील उपनद्यांमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थिती लक्षात घेता गढवाल भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी या घटनेविषयी सांगितले की, नदीच्या प्रवाहात घट झाला आहे, ही एक दिलासा देणारी बाब आहे आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. रावत यांनी ट्विट केले की, ‘दिलासादायक बातमी अशी आहे की नंदप्रयागच्या पलीकडे अलकनंदा नदीचा प्रवाह सामान्य झाला आहे.  नदीची पाण्याची पातळी आता सर्वसाधारणपणे एक मीटर वर आहे परंतु प्रवाह कमी होत आहे. राज्याचे मुख्य सचिव, आपत्ती सचिव, पोलिस अधिकारी आणि माझी सर्व टीम आपत्ती नियंत्रण कक्षातील परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहे.’
 चमोली जिल्ह्यातील सखल भागातील धोका लक्षात घेता नद्यांमध्ये पूर आल्यानंतर राज्य आपत्ती निवारण दल आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाल्यानंतर गढवाल भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा