अंतिम वर्षाच्या परीक्षा केव्हा होणार…?

मुंबई, ३० ऑगस्ट २०२०: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हे निश्चित झालं आहे. मात्र, असं असलं तरी आता या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे किती कालावधी शिल्लक राहिला आहे? असा प्रश्न निर्माण झालायं. कारण, या अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घ्यायच्या की त्या पुढे ढकलायच्या याबाबत सध्या चर्चा चालू आहे. याबाबत काल कुलगुरूंसोबत बैठक घेण्यात आली होती. यामध्ये कुलगुरूंची समिती स्थापन केली गेली होती. यातील संचालकांची देखील आज बैठक पार पडणार आहे. परीक्षा केव्हा होतील याबाबतचा निर्णय उद्या दुपारपर्यंत येणे अपेक्षित आहे.

आज होणाऱ्या या बैठकींमध्ये विविध महाविद्यालयातील प्राचार्य देखील सहभागी होणार आहेत. आजच्या बैठकीत परीक्षा केव्हा घ्याव्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. परीक्षा ३० सप्टेंबर रोजी घेण्यात यावी कि पुढे ढकलावी याबाबत चर्चा होऊ शकते. तसेच या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की नेहमीप्रमाणे परीक्षा हॉलमध्ये घ्यायच्या याबाबत देखील चर्चा आज या समितीमध्ये केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक विद्यापीठे आहेत, या विद्यापीठांमध्ये एकसूत्री कार्यक्रमाअंतर्गत परीक्षा घेतल्या जाणार आहे का? कारण सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळेस घेतल्या तर समान न्याय विद्यार्थ्यांना मिळेल, याबाबत देखील चर्चा आज होणार आहे.

या बैठकीचा जो अहवाल असणार आहे त्यावर मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. उदय सामंत यांनी असे सांगितले आहे की उद्या बारा वाजेपर्यंत याबाबत निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाईल. साधारणतः या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ४० ते ४५ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. तसेच पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी किंवा येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर प्रमाणपत्र कसे उपलब्ध करून दिले जाईल याबद्दल देखील विचार केला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा