नाशिक, ४ मार्च २०२३ : एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. दुसरीकडे भाजीपाल्यालाही भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच जोपुळ (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील शेतकऱ्याला कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार? असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, जोपुळ (ता. दिंडोरी, जिस. नाशिक) येथील शेतकऱ्याने आज शेतातील कोथिंबीर काढून व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी आणलेली होती; मात्र योग्य भाव न मिळाल्याने बाजार समितीच्या बाहेरच रस्त्यावर फुकट वाटण्यास सुरवात केली. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार लागवडीचा खर्च, मजूर खर्च, गाडी भाड्याचा खर्च हे सगळे पकडून आज कोथिंबीरला एक रुपया जुडीचा भाव मिळाला. यावेळी रस्त्यावर उभे राहून या शेतकऱ्याने कोथिंबीरच्याया जुड्या फुकट वाटण्यास सुरवात केली. यावेळेस रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी गाड्या थांबवीत कोथिंबिरीच्या जुड्या घेण्यास सुरवात केली.
गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दर घसरल्याने शेतकरी संतप्त असून, दुसरीकडे सरकार वारंवार आश्वासन देत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. विधान भवनातदेखील याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. दुसरीकडे कांद्याला भावच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर नांगर फिरविल्याचे दिसून आले. कांद्याबरोबर इतर पीक घेणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लागवड केलेल्या पिकातून उत्पादन खर्च तर सोडाच; पण मालाचा वाहतूक खर्चदेखील निघत नाही. अशात एक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने नाशिक शहरातील दिंडोरी नाका परिसरात कोथिंबीर फुकट वाटली आहे.
फुकट वाटत असल्याने कोथिंबीर घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली दिसून येत होती. लोक गाड्या थांबवून कोथिंबीर घेत होते. शेतकरी जगला तर सगळे लोक जगतील. श्रीमंत असो, मध्यमवर्गीय, गोरगरीब असो सगळे शेतीमालावर अवलंबून आहे; मात्र कचऱ्यापेक्षा वाईट परिस्थिती जर शेतीमालाची आहे. त्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर यायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना तिथे बाजार समिती योग्य भाव देत नाही. भाजीपाल्याला एक रुपया, दोन रुपये भाव भेटतो. ४० किलोमीटरवरून येऊन भाजीला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याने मरायचे का, असा आर्त सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील