मुंबई २२ जून २०२३: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भाजपवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, गेल्या ५ महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तसेच राज्याच्या विविध भागातून ३१५२ मुली बेपत्ता झाल्या आहेत. जिथे राज्यकर्ते मजबूत आहेत, तिथे दंगली होत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. देशात ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची सत्ता नाही अशा ठिकाणीच दंगली होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केले. शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले की, पीएम मोदींनी तीन वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगितले होते पण उत्पन्न वाढले तर नाहीच, शेतकऱ्यांच्या आत्महत्याच वाढल्या. शरद पवार म्हणाले की कोल्हापूर, अकोला, अमळनेर या शहरात गेल्या काही महिन्यांपासून दंगली झाल्या. जिथे सत्ताधारी पक्षाची ताकद नाही. सर्व नागरिकांना सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी असताना असे होत नाही. शेतकरी समाधानी नाही, मुली आणि अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत.
मणिपूर हिंसाचारावरही शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून दंगल सुरू आहे. तेथून जी माहिती समोर येत आहे ती अत्यंत गंभीर आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत की नाही हे समजत नाही. शेजारील चीनची कुरघोडी ही चिंताजनक असली तरी राज्यकर्ते त्याकडे लक्ष देत नाहीत. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना तिथे येऊ दिले नाही. त्यांना बोलावले असते तर प्रोटोकॉलनुसार उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले असते. त्यामुळे राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रणही देण्यात आले नव्हते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड