कोल्हापूर, ९ ऑगस्ट २०२३ : जयप्रभा स्टुडिओ जागेच्या बदल्यात पर्यायी जागा देणे अथवा टीडीआर देण्याबाबत शासन आदेश चुकीचे आहेत. या जागेच्या व्यवहाराच्या दस्त नोंदणीसाठी सचिन राऊत यांनी साडेसहा कोटी रुपये भरले आहेत. पानपट्टीचालक असणाऱ्या राऊत यांच्याकडे एवढी रक्कम कडून आली, याचा तपास करावा तसेच या व्यवहारा विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाकरे गटांचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले आहे.
या जागेवर असणाऱ्या पन्नास हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड होत नसल्याने बँकेकडून लिलावात ही जागा लता मंगेशकर यांनी घेतली. यानंतर या जागेची आता दुसऱ्यांदा विक्री झाली आहे. या जागेचा दस्त नोंदवताना सचिन राऊत यांनी साडेसहा कोटी कुठून आणले? या कंपनीतील भागधारक म्हणून ऋतुराज क्षीरसागर असून अनावधानाने हा व्यवहार झाल्याचे सांगितले आहे.
आयकर कार्यालयात आज जाऊन राऊत हे आयकर विवरण पत्र भरतात. त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली का, याबाबतचे निवेदन आयकर अधिकाऱ्यांना देणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनीही या जागेचे हस्तांतरण करु नये, अशा मागणीचे निवेदन दिल्याचे इंगवले यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, स्मिता माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर