मुंबई, ५ ऑक्टोबर २०२२ : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत पाठवण्याची योजना आखण्यात आली असून त्यासाठी १७०० बसेसचं बुकिंग करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये रोख भरल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. यावर देशात नोटबंदी झालेली असताना १० कोटी रुपयांची इतकी मोठी रोख रक्कम कुठून आली असे म्हणत विरोधकांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या मुद्द्याला हात घातला असून याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे.
नोटबंदी असलेल्या देशात जर १० कोटी रुपयांची कॅश दिली जात असेल आणि ती कॅश मोजण्याला दोन दिवस लागले असेल तर या नोटा आल्या कुठून? आपण सगळ्यांनीच हा विषय फार गांभिर्याने घेतला पाहिजे. सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन आणि बँकेमार्फत करत असल्यामुळे कोणाच्याच हातात नोटा नसतात. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्यामुळे याची चौकशी व्हायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
याचबरोबर, सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, ” राज्यात आलेल्या नवीन सरकारने निधी थांबवला आहे. ते पैसे तुमचे आहेत. तुम्ही कर भरता म्हणून सरकार चालते. तसेच, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेत मिळत नाहीत. लहान मुलांच्या दुपारच्या जेवणाच्या पैशाला कट मारला आहे. त्यांच्या जेवणातील भात, भाज्या राज्य सरकारने कमी केले आहे. एकीकडे आपल्या काही योजना कमी करत आहेत आणि इकडे दहा कोटी रुपये रोकड भरत आहेत.. मला तर वाटते आपण लाटणे घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढायला हवा, पण मंत्रालयात मंत्री जागेवर नसतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड