पुरंदर, दि. १५ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यात कोवीड रुग्ण वाहिकेच्या बाबतीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनता पुरती हैराण झाली आहे. कोरोनाच्या बाबतीत उपाय योजना करताना प्रशासनाकडून अनेक चुका होत असून पोलीस खाक्या दाखवत लोकांना घाबरवण्याचे काम पुरंदरच्या प्रशासनाकडून सुरु आहे. कोरोना पॉझिटिव्ह लोकांना आता तालुक्यात कोविडसाठी असलेली स्पेशल रुग्णवाहिका ही मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे आता लोकांना आठ तासांपर्यंत वाट पाहूनही रुग्णवाहिका मिळेनाशी झाली आहे.
पुरंदर तालुक्यात कोविडचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाल्यापासून आजपर्यंत पुरंदर मधील कोरोना व्यवस्थापनाबाबतची परीस्थिती भयंकर होऊ लागली आहे. आता तालुक्यात दररोज सरासरी ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. या लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधा पुरवण्यात प्रशासनाची दमछाक होताना दिसते आहे. तर प्रशासनातील अनेकजण उपाय योजना करण्यापेक्षा स्वतःची कातडी बचाव धोरण अवलंबत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही गावात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला कोविड केअर सेंटरपर्यंत उपचारासाठी नेण्यासाठी पुरंदर तालुक्यासाठी खास कोविड रुग्णवाहिका देण्यात आली आहे. मात्र ही रुग्णवाहिका मिळण्यासाठी लोकांना ८ ते १२ तासांपर्यंत वाट पहावी लागत आहे. या काळात या रुग्णाला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे.
काल नीरा येथे सुद्धा हाच अनुभव पाहायला मिळाला. होम टू होम सर्वे दरम्यान काल नीरा येथील सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र या लोकांना आठ तास कोणतीही रुग्णवाहिका मिळाली नाही .विशेष म्हणजे यामध्ये नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाच्या सहा वर्षाच्या मुलीचा व शिपायाच्या कुटुंबातील लोकांचाही समावेश होता. ज्याने आत्तापर्यंत अनेक आजारी लोकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पोहचवले किंवा ज्यांनी उपचारासाठी मदत केली त्याच्याच कुटुंबातील लोकांना काल अर्धी रात्र होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ताटकळत उभे रहावे लागले. हे पुरंदरच्या आरोग्य यंत्रणेचं अपयश आहे. हे असच सुरु राहीलं तर पुरंदर मध्ये भयंकर परिस्थिती पाहायला मिळू शकते. तेव्हा प्रशासनाने आताच जागे व्हायला हवे. अन्यथा लोकक्षोभाला सामोरे जावे लागणार हे निश्चित. जिल्हाधिकारी पुरंदरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पुरंदरसाठी रुग्णवाहिका भाड्याने घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र प्रशासनाने अजूनही कोणतीही रुग्णवाहिका भाड्याने घेतली नाही. त्यामुळे लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पुरंदर मध्ये जेजुरी ग्रामीण रुग्णालय मध्ये १०८ ची कोविडसाठी एक रुग्णवाहिका आहे. ही रुग्णवाहिका गेली आठ दिवस बंद आहे त्यामुळे १०८ ला फोन केल्यानंतर पुणे किंवा बारामती येथून रुग्णवाहिका येते. त्यामुळे पुरंदर मध्ये रुग्णवाहिका यायला वेळ लागतो आणि रुग्णांना ताटकळत राहावे लागते. प्रशासन मात्र याकडे लक्ष ना देता तुमच्या वाहनाने कोविड सेंटरपर्यंत जाण्याचा सल्ला देत आहेत. मात्र यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यात मदत होत आहे.
“१०८ ची रुग्णवाहिका उशिरा येत असेल तर त्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार करायला हवी. पुरंदरसाठी आम्ही आता दोन ॲम्बुलन्स भाड्याने घेत आहोत. तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आता स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील काळात लोकांना समस्या निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.” – डॉ. विवेक आबनावे. (तालुका वैद्यकीय अधिकारी)
न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे