मुंबई, 10 डिसेंबर 2021: सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळं राज्यातील अनेक नेते दिल्लीत आहेत. यामध्ये संजय राऊत देखील आहेत. 12 खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेबाहेर निदर्शनं केली जात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हजेरी लावली होती. यावेळी संजय राऊत शरद पवारांसाठी खुर्ची नेत असतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1468469913127841793?s=20
विशेष म्हणजे असं बोलताना ते दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. संजय राऊत यांना पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे”.
पुढे ते म्हणाले की, “त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालूप्रसाद यादव असे जरी कोणी नेते आले असते आणि जर त्यांनाही असा त्रास असता तर नक्की मी त्यांना स्वत: ही खूर्ची आणून दिली असती. कारण राजकारणात जरी मतभेद असले तरी ते पितृतूल्य लोकं आहेत”.
https://www.facebook.com/saudautekraut/videos/422997162699560/
कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
दरम्यान भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला हे संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही सांगा त्यांना…ही चु** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील”.
“शरद पवार किंवा त्यांच्या वयाचे, उंचीचे नेते या देशात आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देणं यामुळे त्रास होत असेल तर तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मोठ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना त्रास आहे, शारिरीक वेदना आहेत त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे,” असंही ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे