शिरूर, २९ जुलै २०२०: पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळील वाडा कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहणारे एक जोडपे होते. मात्र अचानक त्या इसमाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले आणि त्याने प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत रात्री झोपतेच तिचा गळा चिरला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर येथील आरोपी दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड (वय ३३ ) हा तरुण भाडाने एका खोलीत राहायला होता आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीत खाजगी कंपनीच्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तर त्याची प्रेयसी सारिका सुदाम गिरमकर (वय ३०) एका रुग्णालयात कामाला होती. दत्तात्रय आणि सारिकाचे प्रेम संबंध जुळले आणि दोघांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचे ठरवले. सारिका ही आपली पत्नी असल्याचे आरोपीने घरमालकाला सांगितले होते.
दत्तात्रय गायकवाड हा मूळचा शिंदोडी (ता.शिरुर) येथील रहिवासी आहे. काही दिवसांपासून दत्तात्रय हा सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. १५ दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद आणि भांडणे होत होती. त्यांच्यातील सततच्या या वादाला कंटाळून घर मालकाने खोली खाली करायला सांगितली होती.
सोमवारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात दत्तात्रय गायकवाडने सारिका झोपेत असतानाच तिचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतःहून शिरूर पोलीस स्टेशनला हजर होऊन आपणच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली.
सारिका गिरमकर या महिलेच्या हत्येप्रकरणी खोली मालकांच्या फिर्यादीनुसार प्रियकर दत्तात्रय गायकवाड यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरुर पोलीस करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी












































