कोण आहेत पद्म पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य आणि संध्या मुखर्जी?

नवी दिल्ली, 27 जानेवारी 2022: पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांनी पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलाय. सरकारने बुद्धदेव भट्टाचार्य यांना पद्मभूषण आणि संध्या मुखर्जी यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता.

पुरस्कार स्वीकारण्यास नकार देण्यामागचं कारण स्पष्ट करताना बुद्धदेव भट्टाचार्य म्हणाले की, त्यांना त्याबाबत माहितीही देण्यात आली नव्हती. त्याचवेळी, संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता हिनं इंडिया टुडेला सांगितले की, वयाच्या 90 व्या वर्षानंतर त्यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीला पद्मश्री देणं अत्यंत अनादरकारक आहे.

पद्म पुरस्कार हा देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. अशा स्थितीत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, ज्यांनी पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला, ते कोण आहेत?

बुद्धदेव भट्टाचार्जी हे 11 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिले आहेत

– बुद्धदेव भट्टाचार्य हे 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते होते. बुद्धदेव भट्टाचार्जी यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. त्यांचे वडिलोपार्जित घर बांगलादेशात आहे.

– त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बंगाली साहित्याचा अभ्यास केला आणि बांगला (ऑनर्स) मध्ये बी.ए.ची पदवी मिळवली. यानंतर ते 1966 मध्ये सीपीएममध्ये दाखल झाले. त्यांची सीपीआय(एम) च्या युवा शाखा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे राज्य सचिव म्हणून निवड झाली.

– 1977 मध्ये, त्यांनी उत्तर कोलकातामधील कोसीपोर मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. 6 नोव्हेंबर 2000 रोजी, बुद्धदेव भट्टाचार्य यांनी ज्योती बसूंच्या जागी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

– बुद्धदेव भट्टाचार्य हे बंगालमध्ये औद्योगिकीकरण सुरू करणारे मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं जातं. त्यांनीच टाटा नॅनोचा प्लांट कोलकाताजवळ सिंगूर येथे उभारण्यास मान्यता दिली.

– 2011 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं डाव्यांना संपवलं. बंगालमध्ये 34 वर्षे राज्य करणाऱ्या डाव्यांचा सफाया झाला. बुद्धदेव भट्टाचार्य यांचाही पराभव झाला. भट्टाचार्य हे पश्चिम बंगालचे शेवटचे डावे मुख्यमंत्री आहेत.

संध्या मुखर्जी या 60 आणि 70 च्या दशकातील गायिका आहेत

– संध्या मुखर्जी यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1931 रोजी कलकत्ता (आता कोलकाता) येथील धाकुरिया येथे झाला. त्यांचे वडील रेल्वे अधिकारी होते. 6 भावंडांमध्ये संध्या सर्वात लहान आहे.

– पंडित संतोष कुमार बसू, प्रोफेसर एटी कन्नन आणि प्रोफेसर चिन्मय लाहिरी यांच्याकडून त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचे गुरू उस्ताद बडे गुलाम अली खान होते. उस्ताद गुलाम अली खान यांच्यानंतर त्यांचे पुत्र उस्ताद मुनव्वर अली खान त्यांचे गुरू झाले, ज्यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीतात प्रभुत्व मिळवलं.

– हिंदी चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यांनी 17 हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांची सुरुवात त्यांनी 1950 मध्ये आलेल्या तराना चित्रपटातून केली होती. यानंतर, 1952 मध्ये, त्या वैयक्तिक कारणास्तव कोलकात्याला परतल्या. त्यांनी बंगाली कवी श्यामल गुप्ता यांच्याशी 1966 मध्ये लग्न केलं.

– संध्या मुखर्जी या 60 आणि 70 च्या दशकातील सर्वात गोड आवाज मानल्या जातात. त्यांनी हजारो बंगाली आणि बिगर बंगाली गाणी गायली आहेत. संध्या आणि हेमंत मुखर्जी यांची जोडी आजही संगीतप्रेमींच्या स्मरणात आहे.

– 2011 मध्ये संध्या मुखर्जी यांना पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘बंग विभूषण’ मिळाला होता. 1970 मध्ये ‘जय जयंती’ नावाच्या बंगाली चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा