पुणे, ३ नोव्हेंबर २०२२: गुजरातच्या मोरबी दुर्घटनेने संपूर्ण देश हादरलाय. १३५ निरपराधांना कोणताही दोष नसताना जीव गमवावा लागलाय. या प्रकरणाचा तपास पोलीस आणि तपास यंत्रणांनी सुरू केला असून, अनेकांना अटकही करण्यात आली असून आता काही खुलासेही होतायत. या खुलाशांमुळं मोरबी केबल पुलाच्या नूतनीकरणाचं काम ज्या ओरेवा कंपनीकडं सोपवण्यात आलं होतं, त्यावर गंभीर प्रश्न निर्माण झालेत.
पैशाच्या लोभापोटी अपघात?
आता पोलीस तपासात मोठी बाब समोर आलीय. ज्या ओरेवा कंपनीनं ऑक्टोबरमध्येच हा झुलता पूल जनतेसाठी खुला केला होता, प्रत्यक्षात हा पूल उघडण्याची वेळ डिसेंबरमध्ये होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला नूतनीकरणासाठी डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण दिवाळी जवळ आल्यानं या सणातून अधिक पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, त्यामुळंच हा पूल वेळेपूर्वीच जनतेसाठी खुला करण्यात आला. आता १३५ लोकांच्या मृत्यूचं हे प्रमुख कारण मानलं जातंय.
निष्कृष्ट दर्जाचं साहित्य
पुलाच्या नूतनीकरणात वापरण्यात आलेलं साहित्य दर्जेदार नसल्याचा दावाही तपासात करण्यात आलाय. पूल सुरू करण्यापूर्वी ज्या केबल्स बदलायला हव्या होत्या, त्याही ठेकेदारानं बदलल्या नाहीत. अशा स्थितीत पोलिसांच्या तपासात मोठ्या निष्काळजीपणाकडं लक्ष वेधलं जातंय. हा निष्काळजीपणा ओरेवा कंपनीकडून आणि त्यांना कंत्राट दिलेल्या लोकांकडून झालाय. ओरेवा कंपनीवरही असा आरोप करण्यात आलाय की, त्यांच्या बाजूनं पूल सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचं मतही घेतलं गेलं नाही. पुलाची क्षमता किती असंल, याचं वास्तव समोर आलेलं नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या दुर्घटनेनंतर असे गंभीर आरोप होत असलेल्या ओरेवा कंपनीला २००७ मध्येही याच पुलाचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्यानंतरही त्यांच्याकडं नूतनीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोरबीचे एसपी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची प्रत्येक बाजूनं चौकशी करत आहोत. सुरुवातीपासून दुर्घटनेच्या दिवसापर्यंत प्रत्येक पैलूंचा बारकाईनं तपास केला जातोय. जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणाला वाचवण्याचं किंवा दिलासा देण्याचं काम होणार नाही. आता पोलिस प्रत्येक दोषींवर कारवाई करण्याबाबत बोलतायत, मात्र आतापर्यंत अटक करण्यात आलेले व्यक्तीच पोलिस तपासात सहकार्य करताना दिसत नाहीत.
या कॉन्टॅक्ट मध्ये देव प्रकाश फॅब्रिकेशनचा हात काय?
समोर आलेल्या पोलिस रिमांड कॉपीमध्ये एकही आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याची बाब समोर आलीय. दुरुस्तीबाबत कोणाच्याही बाजूनं माहिती दिली जात नाही. प्रत्येकजण एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. रिमांड कॉपीमध्ये देव प्रकाश फॅब्रिकेशनचं नावही नमूद करण्यात आलंय. २०२२ मध्ये ओरेवा कंपनीला झुलत्या पुलाच्या नूतनीकरणाचं काम देण्यात आलं असतानाही देवप्रकाश फॅब्रिकेशनकडून क्रॉस टेंडर काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता देव प्रकाश फॅब्रिकेशनचा या व्यवहारात सहभाग कसा झाला, याचा तपास पोलीस करतायत.
आतापर्यंत कोणाला अटक केली?
घटनेच्या दिवसापासून मोरबी पोलीस सविस्तर तपास करतायत. त्यांच्या वतीनं घटनास्थळावरून सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर गोळा करण्यात आलेत. फुटेजमध्ये येणारी गर्दी, निघणाऱ्या लोकांची संख्या आणि पुलावर येणाऱ्या लोकांच्या क्षणांचं फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात आल्याचीही चर्चा आहे. तांत्रिक विश्लेषणातून केबलची योग्य क्षमता आणि दर्जाही तपासला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्या अहवालाच्या आधारेच पुढील अटक शक्य आहे.
या प्रकरणी आतापर्यंत ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक दीपक पारखे, दिनेशभाई दवे, तिकीट लिपिक मनसुख वालजीभाई, प्रकाशभाई लालजीभाई, सुरक्षा रक्षक अल्पेश भाई, दिलीप भाई आणि मुकेश भाई यांना अटक करण्यात आलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे