पुणे, १० ऑगस्ट २०२०: गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच पुण्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पुुण्यात याआधी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदी नियुक्ति झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी पद सध्यातरी रिक्तच आहे.
कोरोनासारख्या भयंकर संकटाशी लढत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णी होईल याबाबत सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. राम यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पुणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा नवीन अधिकाऱ्यावर निश्चित दबाव असणंर आहे. परंतु, पुणेकरांचा नवीन जिल्हाधिकारी कोण?याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्यातरी याबाबत तीन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत असलेल्या नावांविषयीची माहिती दिली. जिल्हाधिकारी पदासाठी तीन नावे सध्या स्पर्धेत आहेत. यात पहिले नाव सध्याचे हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आहे. तर दुसरे नाव लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आहे. या स्पर्धेत तिसरे नाव योगेश म्हसे यांचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी