विना मास्कचा दंड सर्व सामान्यांना ५०० तर राज्यमंत्र्यांनाच १०० रुपयेच का?- ॲड. शरद जामदार

इंदापूर, २ नोव्हेंबर २०२०: महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यात स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असून काल पुन्हा एकदा याची प्रचिती आली. परंतु यावेळी मात्र या स्टंटबाजीने सर्वसामान्य जनता नाराज असल्याचे दिसून आली. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरत असताना सर्वसामान्य जनतेला पाचशे रुपयांचा दंड प्रशासनाकडून आकारण्यात येतो परंतु एका कार्यक्रमात राज्यमंत्र्यांनी चूक करून देखील केवळ राज्यमंत्री असल्याने त्यांना शंभर रुपयेच का दंड आकारण्यात आला असा सवाल इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केला.

शरद जामदार म्हणाले की, ‘तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिकच गडद होत असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे एकीकडे अपयशी ठरत आहेत. दुसर्‍या बाजूला स्टंटबाजी करून नागरिकांनीच आपल्या कुटुंबाची खबरदारी घ्यावी असे आवाहन करीत आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा मास्क निसटला यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीकडे शंभर रुपयांचा दंड भरला असल्याचे विविध वर्तमानपत्रातून आलेल्या बातमीमधून समजले. सर्वसामान्य नागरिक असतील तर त्यांना ग्रामपंचायतीने पाचशे रुपयांचा दंड आकारला असता तर हा न्याय राज्यमंत्र्यांना का नाही असा सवाल जनतेतून झाला असून यामुळे नागरिकांना मनस्ताप देखील झाला आहे.

स्टंटबाजी आणि विना मास्क शंभर रुपये दंड का? यांची इंदापूर तालुक्यात काल दिवसभर सर्वत्र चर्चा होती. लोकांनी या विषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा