नवी दिल्ली, २२ एप्रिल २०२३: भाजपने लपविण्यासारखे काहीही केलेले नाही. सत्यपाल मलिक हे आता आरोप करत आहेत. या आरोपांची विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे. राज्यपाल असताना त्यांनी मौन का बाळगले होते. असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या चुकीमुळेच पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला, असा आरोप मलिक यांनी केला होता. याबाबत एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, आपल्यापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. म्हणूनच सर्व आरोप हे संशयास्पद आहेत.
सत्यपाल मलिक यांना केंद्रशासित प्रदेशांतील कथित विमा घोटाळ्यासंदर्भात काही प्रश्नांची उत्तरे देण्यास सीबीआयने सांगितले आहे. याबाबत बोलताना शहा म्हणाले, सीबीआयने त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सीबीआयने त्यांची चौकशी केली आहे. तपास यंत्रणा आपले कर्तव्य बजावत आहे. सीबीआयच्या समन्सचा आणि त्यांनी नुकत्याच केलेल्या आरोपांचा काहीही संबंध नाही, असेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर