चिंकारा हे भारतातील शुष्क प्रदेशात आढळणारे हरीण आहे. याची उंची ६० ते ६५ सेमी पर्यंत असते तर वजन साधारणपणे १५ ते २५ किलोपर्यंत असते. याची हरीणातील कुरंग गटात वर्गवारी होते. कुरंग हरीणांची सर्व वैशिठ्ये चिंकाऱ्यात दिसून येतात. पळण्याचा वेग, शिंगाची रचना, विणीचा हंगाम इत्यादी. परंतु इतर कुरंग हरीणांपेक्षा हे हरीण एकटे दुकटे फिरताना जास्त आढळून येते. चिंकाऱ्याचे कळप काळवीटाच्या कळपा पेक्षा लहान असतात. चिंकाऱ्यांचा सर्वात मोठा कळप १० ते २० जणांचा असतो तर सर्वात छोटा ३ ते ४ जणांचा. आपल्या प्रदेशाची सीमा निश्चित करण्यासाठी नर ठराविक जागी लेंड्या टाकून प्रदेशनिश्चिती करतो.
चिंकारा सडपातळ, बांधेसूद आणि डौलदार प्राणी आहे. शरीराची वरची बाजू फिक्कट काळसर तांबूस असून खालच्या बाजूला लागून असलेला तिचा भाग व मागचा भाग जास्त गडद असते. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना पांढरी रेषा असते. नाकाच्या वर एक काळसर चट्टा असतो. नराची शिंगे सरासरी २५–३० सेंमी. आणि मादीची १०–१३ सेंमी. लांब असतात. नराच्या शिंगांवर १५–२५ कंगोरेदार वलये असतात, पण मादीची शिंगे नितळ असतात. शिंगे नसलेल्या माद्याही बऱ्याच आढळतात. यांचे डोळे, नाक आणि कान तीक्ष्ण असतात. यांचा प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नाही. मादीला एकावेळी एक किंवा दोन पिल्ले होतात.
चिंकारा हरिणाचा वावर मुख्यत्वे राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील दुष्काळी जिल्ह्यात आहे. भारताच्या वायव्य आणि मध्य विभागांतील मैदानी प्रदेश, लहान टेकड्या आणि महाराष्ट्राचा उघडा प्रदेश यांत चिंकारा आढळतो. भारताबाहेर याचा वावर पाकिस्तान, इराण या देशात आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरुर तालुक्यात तसेच सोलापूर च्या काही भागात आणि नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात चिंकारा बऱ्यापैकी आढळतो. ओढे आणि घळी असलेल्या ओसाड जमिनी, विखुरलेली झुडपे आणि विरळ जंगले यांत हा सामान्यतः राहतो. माणसांना पाहून बुजत असल्यामुळे चिंकारा पिकात शिरत नाहीत.
अत्यंत शुष्क वातवरणाला या प्राण्याने जुळवून घेतले आहे. याची पाण्याची गरज अत्यंत कमी असते. विनापाणी अनेक दिवस चिंकारा जगू शकतो. गवत, निरनिराळी फळे, पाने, धान्य इत्यादींवर ते उदरनिर्वाह करतात. भारतात याचे नैसर्गिक शत्रू लांडगा व चित्ता आहे. गुजरातमध्ये गीरच्या अभयारण्यात सिंह आहे. त्यातील भारतातून चित्ता नामशेष झालाय तर लांडगे अत्यंत दुर्मिळ झाले आहेत.
भारतात चिंकाऱ्यांना वन्य प्राणी संरक्षण कायद्याने संरक्षण मिळाले आहे. अभिनेता सलमान खान याला चिंकाराच्या हत्येसाठी शिक्षा झाली होती. चिंकारा हरणाची जात सध्या धोकादायक स्थितीत असून त्यांची संख्या सतत कमी होत आहे. अशा या चिंकारा हरणासाठी महाराष्ट्र शासनाने दि.१९ ऑगस्ट १९९७ रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या सुपे गावातील ५१४.५५ हेक्टरचे क्षेत्र ‘मयुरेश्वर अभयारण्य’ म्हणून घोषित केलय. मयुरेश्वर अभयारण्यात चिंकारा मोठया प्रमाणात आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.