कोल्हा हा सर्वांना परिचित असा प्राणी. गावातल्या लोकांना, शेतकऱ्यांना हा प्राणी नवीन नाही. लहान असल्यापासून कथा गोष्टींमध्ये, गाण्यात आपण कोल्हा हे नाव ऐकत आलोय. कोल्हे संधीसाधू शिकारी आहेत. ते लहान सस्तन प्राणी, पक्षी, कीटक आणि अगदी फळे आणि भाज्यांसह विविध प्रकारचे अन्न खातात. ते त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि अनुकूलतेसाठी ओळखले जातात तसेच विविध वातावरणात जगण्यास ते सक्षम आहेत.
कोल्हा हा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील कॅनिडी कुलामधील प्राणी आहे. कुत्रे, लांडगे, खोकड इ. प्राणी याच कुलात येतात. कोल्ह्याला अधिवासासाठी कोणतेही हवामान म्हणजेच दमट वने, मोकळी मैदाने, वाळवंट चालते. उंचीवरील डोंगर टेकड्याच्या आजूबाजूला कोल्हे आढळतात, तर हिमालयात जवळपास चार हजार मीटर उंचीवरदेखील ते सापडतात.
भारतीय कोल्ह्याची उंची दोन फुटापर्यंत असते. डोक्यासकट शरीराची लांबी अडीच फुटापर्यंत असून शेपूट एक फूट लांब असते. त्याचे वजन आठ ते पंधरा किलोपर्यंत असते. मादीच्या तुलनेत नराचे वजन जास्त असते. कोल्ह्याचा रंग भुरकट तपकिरी काळसर असतो. रंग भोवतालच्या पर्यावरणानुसार बदलतो. खांदे व कान यांच्याजवळील आणि पायांचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर यांचे मिश्रण असलेला असतो. त्यांचे लांब पाय आणि तोंडात वळलेले सुळे हे छोटे सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी यांच्या शिकारीसाठी अनुकुल आहेत. पायांतील जुळलेली हाडे आणि मोठी पावले यांच्या साहाय्याने ते पळताना, दूरपर्यंत १६ किमी. प्रतितास इतका वेग राखू शकतात.
मुख्यत: शहर व खेडेगावाच्या आसपास राहणे कोल्ह्याला पसंत आहे. शेतजमिनीत बिळे करून किंवा दाट गवतात आणि पडक्या जागी घर करून ते राहतात. कोल्हे हे नर-मादीच्या जोडीने राहतात आणि त्यांच्या जोडीचा वावरण्याचा प्रदेश निश्चित ठरलेला असतो. त्यांचा वावर जेवढ्या भागात असतो त्याची सीमा ठरविण्यासाठी ते हद्दीवर मल-मूत्राचा वापर करतात. सहसा ते आपल्या हद्दीत दुसर्या जोडीला येऊ देत नाहीत. कोल्ह्याच्या मादीला फेब्रुवारी ते मार्च-एप्रिलमध्ये चार पिले होतात.
कोल्हा निशाचर असून भक्ष्य मिळविण्यासाठी रात्री बाहेर पडतो. शेळ्यामेंढ्यांची करडे वगैरे लहान सस्तन प्राण्यांवर तो हल्ला करतो. कोंबड्यांना यांच्यापासून फार मोठा धोका असतो. तो मेलेली जनावरे आणि त्यांचे कुजके मांस देखील खातो. जंगलात वाघ सिंह किंवा इतर प्राण्यांच्या शिकारीतले उरलेले मांस हा खातो. जनावरांची मढी खाताना अनेक कोल्हे जरी एकत्र येत असले तरी ते शिकार मात्र ते जोडीने करतात.
कोल्हे एकटे किंवा काही वेळेला दोन-तीनच्या गटात असतात. संध्याकाळी किंवा पहाटे बरेच कोल्हे एकदम ओरडतात. त्यांच्या ओरडण्याला कोल्हेकुई म्हणतात. कोल्ह्याच्या शेपटीखालच्या गंधग्रंथीतून वाहणार्या स्रावामुळे त्याच्या अंगाला उग्र दर्प येतो. कोल्ह्यांना लोककथा आणि पौराणिक कथांमध्ये देखील सामान्यतः वैशिष्ट्यीकृत केले जाते, अनेक संस्कृतीत त्यांना धूर्त आणि कपटीपणाचे द्योतक मानले जाते.
कोल्ह्याच्या सर्वसामान्यपणे आढळणार्या जातीचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस आहे. पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत आढळणार्या कॅनिस मेझोमेलिस या जातीच्या कोल्ह्याची पाठ काळी असते आणि त्यावरील फर मूल्यवान समजली जाते. कोल्ह्याची कॅनिस अडस्टस ही जात आफ्रिकेत आढळते. यांच्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पट्टे असतात. कोल्हे आशिया व आफ्रिका खंडांत तसेच यूरोपात आढळतात. भारतात कोल्हे हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतात.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.