पिसोरी किंवा माऊस डियर हे अत्यंत दुर्मिळ असुन शिंग नसलेल्या हरणाची एकमात्र प्रजाती आहे. हा प्राणी दिसायला आणि आकाराला मोठा उंदीर, डुक्कर आणि हरणासारखा आहे. पिसूरीचे डोके लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला ‘माऊस डियर’ म्हणजेच उंदीर हरीण म्हणतात. कस्तुरी हरिणाप्रमाणेच त्यांना छोटे सुळे असतात. पिसूरी हरीण हे युग्मखुरी वर्गात गणल्या जाणाऱ्या त्रागुलिडी कुळातील प्राणी असून आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत आढळतात. यांची खांद्यापर्यंतची उंची साधारण २५ ते ३० सेमी असते.
भारतीय माऊस डियर विशेषत: घनदाट जंगलात राहतात. माऊस डियर हा चपळ असून अचानक दृष्टीस पडल्यास, उंदीर, डुक्कर आणि हरणाच पाडस यापैकी काहीतरी दिसल्याचा भास होतो. माऊस डियर हा तसा लाजाळू असतो. रात्रीच्या वेळी तो अधिक सक्रिय होतो, याच कारणामुळे त्याच्याबद्दल अधिक संशोधन झालेलं नाही. पिसूरी हरणाच्या दोन विशिष्ट जाती आढळतात. एक आशियायी पिसूरी हरीण व दुसरी आफ्रिकी पिसूरी हरीण. आफ्रिकी पिसूरी हे पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या घनदाट जंगलात आढळते. आशियायी पिसूरी हरणाच्या पाच उपजाती आहेत, यांपैकी एक उपजात भारतात आढळते.
भारतात हरणांच्या एकूण १२ प्रजाती आढळून येतात. माऊस डियर त्यातील सर्वात लहान आकाराची प्रजाती आहे. आर्द्रता अधिक असलेल्या भागांमध्ये माऊस डियर वास्तव्य करतात. हरणासारखा दिसत असला, तरी त्याला शिंगं नसतात. रात्रीच्या वेळेस हा प्राणी अधिक सक्रिय असतो. दिवसा फारसा दृष्टीस पडता नाही. ते नदीजवळ, तलावाजवळ किंवा झाडी असलेल्या खडकाळ भागात आपले घर बनवितात. ते दिवसातील बहुतेक वेळ खडकाच्या कपारीत किंवा दगडाखाली लपून बसणे पसंत करतात. यांचे मुख्य अन्न हे जंगली वनस्पती, गवत, पाने इत्यादी आहे. ते खाली पडलेले फळेही खातात. ते रात्री किंवा पहाटे, छोट्या छोट्या कळपांनी चरायला जातात.
पिसोरीच्या शरीराचा पुढचा भाग थोडासा उंच आहे. यांच्या शरीराचा रंग फिकट भुरकट असतो. अत्यंत फिकट पिवळे पट्टे संपूर्ण शरीरावर असतात. दुरून पाहिल्यावर त्या लांबट रेघा आहेत असे वाटते. पिसूरींच्या शरीराचा खालचा भाग, पोट इतर हरिणांप्रमाणे पांढरे व पिवळे असते. त्यांच्या शरीरावर लहान, मुलायम बारीक केस असतात. डोळे गर्द भुरकट आणि कान सामान्य आकाराचे असतात. शेपूट फार लहान असते. त्यांच्या गळ्याजवळ पांढऱ्या रंगाच्या तीन रेषा असुन डोके इतर हरिणांपेक्षा लहान असते. पायाचे खूर विभागलेले असते. ते खुराच्या टोकावर जोर देऊन चालतात, त्यामुळे त्यांच्या चालण्याचा आवाज होत नाही. मादी पिसूरी पावसाळ्यानंतर किंवा आॅक्टोबर महिन्यात, खडकाच्या कपारीमध्ये किंवा गुहेत, एक किंवा दोन पिल्लांना जन्म देते.
भारतात पिसूरी हरीण दक्षिण भारताच्या जंगलात, पश्चिम घाटातील जंगलात आणि ओरिसाच्या पूर्व किनाऱ्यावर आढळते. याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेशातही ते आढळतात. हा प्राणी इतर छोट्या मोठ्या प्राण्यांचं खाद्य असल्याने याची नैसर्गिक शिकार होत असते. वाढतं अतिक्रमण, जंगलांमध्ये पेटणारा वणवा, माणसांकडून अवैध शिकार यांच्यामुळे माऊस डियरच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्यामध्येही पिसूरी साठी विशेष तरतूद करण्यात आलीय.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.