वन्य प्राणी- गेंडा (Rhinoceros)

33

गेंडा हा जमिनीवरील आकारमानाने मोठ्या असलेल्या प्राण्यांपैकी एक. एक विलक्षण शारीरिक ठेवणीचा प्राणी म्हणून गेंडया कडे पाहिले जाते. आफ्रिका व आशिया खंडाच्या भागात हा प्राणी आढळतो. गेंड्याच्या विविध जाती आफ्रिकेत आणि आशिया खंडात अस्तित्व टिकवून आहेत.

आशिया खंडातील पश्चिम बंगाल, आसाम, आणि नेपाळमध्ये आढळणारा मोठा भारतीय गेंडा र्‍हिनोसेरॉस यूनिकॉर्निस या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सर्वांत मोठ्या गेंड्यांपैकी हा एक आहे. हा स्तनी वर्गाच्या विषमखुरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर असतात. गेंड्याचे शरीर मजबूत व अवजड असते. डोके आकाराने मोठे व नाकावर एकच शिंग असते. मान आखूड आणि पाय खांबासारखे जाड व आखूड असतात. चारही पायांवर खुराने झाकलेली तीन बोटे असतात.

भारतीय गेंड्यांची सरासरी लांबी बारा फुटापर्यंत आणि उंची चार फुटापर्यंत असते. त्याला एकच शिंग असून ते ४० सेंमी. लांब असते. त्वचा जाड, केसविरहित व घड्या असलेली असते. कातडीवर अशा तीन मोठ्या घड्या असतात. त्या चिलखतासारख्या भासतात. केस फक्त कानाच्या बाहेरील बाजूस असतात. शेपटी लहान असून तिच्या टोकाला राठ केस असतात. डोळे लहान असून दृष्टी अधू असते. कान आखूड व उभे असून श्रवणेंद्रिये आणि घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. नराच्या खालच्या जबड्यातील दात २० सेंमी. लांब असून ते सुळ्यांसारखे बाहेर येतात. याचा उपयोग दुसर्‍या नरास पळवून लावण्यासाठी करतात.

गेंड्याच्या आहारात झाडांचे कोंब, डहाळ्या, पाने, बांबूंचे धुमारे आणि मुख्यत: गवत असते. भारतीय गेंडा गवत आणि लहान झुडपांच्या आश्रयाने राहतो तो उंच वाढणार्‍या गवतामध्ये सहजासहजी दिसून येत नाही. गेंड्याची मादी ही नरापेक्षा लहान असते. मादीला शिंग नसते. नराचे वजन २ टन तर मादीचे वजन दीड टना पर्यंत असते. मादीला एका वेळी एकच पिल्लू होते व मादीच्या पुढील गर्भधारणेपर्यंत ते तिच्या बरोबर राहते. गेंड्याच सरासरी आयुष्यमान ३० ते ४५ वर्षे आहे.

गेंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नाकावर असणारे शिंग. भारतीय व जावा जातीच्या गेंड्यांमध्ये नाकाच्या वर एकच शिंग असते. तर इतर जातींमध्ये दोन शिंगे असतात. शिंगांची वाढ आयुष्यभर होते. शिंग भरीव व मजबूत असून ते केस आणि नखसदृश केराटिनच्या घट्ट तंतूंनी बनलेले असते. गेंड्याच्या भांडणात काही वेळा शिंगे तुटतात.

गेंड्याच्या शिंगापासून औषधी निर्माण करण्यासाठी तसेच अंधश्रद्धेच्या भ्रामक समजुतींमुळे, गेंड्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आली आहे. बेसुमार हत्येमुळे गेंडे दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे वन्य जीव कायद्यानुसार त्यांना संरक्षण दिले गेले आहे. भारतात उत्तरेकडे मानस अभयारण्य, काझीरंगा अभयारण्य, दूधवा नॅशनल पार्क व नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यान अशी ठिकाणे गेंड्यांसाठी राखून ठेवली आहेत. भारतीय गेंड्याशिवाय जावा गेंडा, आशियायी दोन शिंगी गेंडा, आफ्रिकी ‘काळा’ गेंडा आणि आफ्रिकी ‘पांढरा’ गेंडा असे त्यांचे इतर प्रकार आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा