वन्यजीवांमुळे मनुष्य जीवन सुखकर – सुनिल लिमये

सोलापूर, ११ जानेवारी २०२२ : माणसाने केलेली घाण स्वच्छ करण्याचे काम निसर्गातील पक्षी करतात. अशा वन्यजीवांमुळे मनुष्य जीवन सुखकर होते, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केले.

डॉ. मेतन फाउंडेशनच्यावतीने सामाजिक वनीकरण सोलापूर आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्याने निर्मलकुमार फडकुले सभागृहात तीन दिवसीय ३४ व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी श्री. लिमये यांनी पक्षीसंवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पशु पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी समाजाचा अभ्यास आणि प्रबोधन होणे अत्यावश्यक आहे प्रत्येक पशुपक्ष्यांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची जागा देणे अत्यंत आवश्यक आहे जैवविविधतेमध्ये पक्ष्यांचे स्थान खूप मोठे आहे ते स्थान जर आपण सांभाळले तर आपण खूप चांगल्या पद्धतीने पक्षीवैभव टिकवण्यात यशस्वी होऊ.

अरण्यऋषी चित्तमपल्ली यांनी समजावले पक्षीनिरीक्षणाचे सूत्र

पक्षिमित्र संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची प्रकट मुलाखत डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी घेतली. यावेळी मारुती चितमपल्ली यांनी पक्षीनिरीक्षणाचे सूत्र उपस्थितांना समजावले. पक्ष्यांना ग्रह, तारे पाहून दिशा ओळखता येतात. हजारो किलोमीटरवरून स्थलांतरित होऊन येणारे पक्षी ठराविक काळानंतर पुन्हा आपल्या अधिवासात अचूकपणे जातात हे पक्ष्यांचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पक्षी कुठे पाहिला, त्याचा रंग आकार कसा आहे या सगळ्याची नोंद पक्षी निरीक्षण करताना डायरीमध्ये करायला हवी. या डायरीच्या आधारेच भविष्यात पक्षी निरीक्षण या विषयाचे निष्कर्ष आपल्याला मांडता येतात, असेही श्री. चित्तमपल्ली यावेळी म्हणाले. यावेळी श्री. चित्तमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जैवविविधता टिकून राहण्यासाठी गवताळ प्रदेश महत्त्वाचा

निसर्गातील जैवविविधता टिकून राहण्यासाठी गवताळ प्रदेशाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन एस. एच. पाटील यांनी केले. राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनात शनिवारी श्री. पाटील यांनी गवताळ प्रदेशाची जैविक विविधता या विषयावर मार्गदर्शन केले. गवताळ प्रदेशाचे पर्यायाने जैवविविधतेचे अस्तित्व राखण्यासाठी गवताळ प्रदेशाचे अग्नी पासून संरक्षण करणे काही उपयुक्त वनस्पती लागवड असे उपाय करता येतील. आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या कौटिल्यीय अर्थशास्त्र या ग्रंथात राखीव कुरणाचेचे महत्व सांगितल्याचे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी अनिल जोशी, मनोज कुलकर्णी, चिदानंद मुस्तारे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा