वन्यप्राणी- पाणमांजर (Otter)

जगभरात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वगळता पाणमांजर सर्वत्र आढळते. त्यांच्या एकूण १३ जाती असून भारतात त्यांपैकी पुढील तीन जाती आढळतात. पहिले म्हणजे यूरेशियन पाणमांजर ‍किंवा कॉमन ऑटर. याचे शास्त्रीय नाव लुट्रा लुट्रा आहे,  दुसरे गुळगुळीत कातडीचे पाणमांजर किंवा स्मूथ कोटेड ऑटर. याचे शास्त्रीय नाव लुट्रा पर्स्पिसिलेटा आहे आणि तिसरे लहान नखीचे पाणमांजर ‍किंवा स्मॉल क्लॉड ऑटर. याचे शास्त्रीय नाव एऑनिक्स सायनेरिअस आहे. भारतात सामान्यपणे गुळगुळीत कातडीचे पाणमांजर आढळते.‍ पाणमांजर हे सस्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या मुस्टिलिडी कुलातील एक प्राणी आहे.

गुळगुळीत कातडीचे पाणमांजर सर्वांत मोठे असून त्याचे वजन सात ते अकरा किलोपर्यंत आणि लांबी तीन ते चार फूट असते. शेपूट पंचेचाळीस सेंमी. लांब असते. पाठीवरील केस लहान व मऊ असतात. रंग पिवळट तपकिरी असून पोटाकडे तो फिकट करडा असतो. त्याच्या तोंडावर केस नसतात. शरीर लांब व निमुळते असते. पायांचे पंजे बळकट असतात आणि बोटांना नख्या असतात. बोटे अपुऱ्या पडद्यांनी जोडलेली असून त्यांचा उपयोग सफाईदारपणे पोहण्यासाठी होतो.

मासे हे पाणमांजराचे मुख्य अन्न आहे. याखेरीज उंदीर, पाणसाप, बेडूक तसेच छोटे पक्षीही ते खाते. पाणमांजरे बऱ्याचदा टोळीने माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात. ऑटर हे विशिष्ट स्नायूंच्या साहाय्याने नाक आणि कान बंद करून ते पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधते. पाण्यात बुडी मारल्यानंतर ते बराच वेळ पाण्याखाली राहू शकते. त्याला शिट्टी मारल्यासारखा आवाज काढता येतो.

भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असणारी सरोवरे, तलाव, नद्या, कालवे, दलदलीच्या जागा, खारफुटीची वने आणि दगडांच्या राशी असलेले नदीकिनारे या ठिकाणी पाणमांजरांच्या वसाहती असतात. नर, मादी व पिले एकत्र वावरतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या अधिवासाच्या जागेची मालकी प्रस्थापित करतात.

त्यांच् विणीचा हंगाम सप्टेंबर–फेब्रुवारी महिन्यांत असतो. या हंगामात ते एका जागी स्थिरावतात व तात्पुरती घरे करतात. मादी एका वेळी दोन ते पाच पिलांना जन्म देते. पिले दोन महिन्यानंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात. एका वर्षानंतर ती स्वतंत्रपणे राहू लागतात. मगर हा पाणमांजराचा नैसर्गिक शत्रू आहे.

भारतात यूरेशियन पाणमांजरे आणि लहान नखी पाणमांजरेही आढळतात. यूरेशियन पाणमांजर पाठीकडे तपकिरी असून पोटाकडे, विशेषत: मानेकडे व छातीकडे, करड्या रंगाचे असते. शरीरावरील केस लांब व दाट असतात. रुंद तोंड, आखूड मान व ढालीच्या आकाराचे केसविरहित नाक यावरून यूरेशियन पाणमांजर ओळखता येते. शरीर तीन फुटापर्यंत तर शेपूट दीड फूट लांब असते. वजन सात ते दहा किलोपर्यंत असते.

लहान नखीचे पाणमांजर भारतात उत्तरेकडे तसेच हिमालयात आढळते. त्याच्या शरीराची एकूण लांबी सव्वातीन फुटापर्यंत तर शेपूट एक फूट लांब असते. वजन पाच किलोपर्यंत भरते. डोके चपटे आणि मान आखूड व जाड असते. रंग तपकिरी-करडा असतो. पंज्याची नखे बोटांच्या जाड आवरणापलीकडे पोहोचत नाहीत. बोटांमधील पडदे पुढील पेरांपर्यंत मर्यादित असतात. नाकावर केस नसतात. ते वेगवेगळे १२ प्रकारांचे आवाज काढून ते इशारे देते.

पाणमांजराच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि उपासमारीमुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे. पाणमांजरांची त्यांच्या मऊसूत फरसाठी केली जाणारी शिकार यासाठी कारणीभूत आहे. याशिवाय बांधकामासाठी घातलेले भराव, जलपर्यटन आणि प्रदूषणामुळे पाणमांजरांचे अधिवास नष्ट होत आहेत. समुद्रात सोडली जाणारी विषारी रसायने आणि तेलगळतीमुळे दरवर्षी हजारो पाणमांजरे मृत्युमुखी पडतात. आययूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले प्राणी या यादीत केला आहे.

भारतात १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे. बंदिस्त अधिवासात पाणमांजरांची पैदास करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. आजघडीला पाणमांजरांच्या १३ प्रजातींपैकी एका प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आहे. तर चार प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचल्या आहेत. सागरी अधिवास सुरक्षित ठेवायचे असतील तर पाणमांजरांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे हे समजून १९९३ मध्ये इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पाणमांजर बचाव निधी (इंटरनॅशनल ऑटर सव्र्हायव्हल फंड) या संस्थेची स्थापना झाली. त्यातूनच पाणमांजराचे जतन आणि संवर्धन करण्याचे जागतिक स्तरावर प्रयत्न केले जातात.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा