वन्यप्राणी- खवल्या मांजर (Pangolin)

खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात. एक भारतीय खवल्या मांजर (मॅनिस क्रॅसिकॉडेटा ) आणि दुसरी चिनी खवल्या मांजर (मॅनिस पेटॅडॅक्टिला). भारतीय खवल्या मांजर हिमालय सोडून सर्वत्र आढळते. चिनी खवल्या मांजर हिमालय, आसाम, नेपाळ, ब्रह्मदेश, दक्षिण चीन, हैनान इत्यादी प्रदेशात आढळते. सस्तन वर्गातील फोलिडोटा गणाच्या मॅनिडी कुलातील हा प्राणी आहे. या कुलात मॅनिस  हा एकच वंश असून त्यात सात जाती आहेत. त्यांपैकी काही आफ्रिकेत व काही आशियात आढळतात.

भारतीय खवल्या मांजराची लांबी शेपटासह तीन सव्वातीन फूट असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात, पण घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. याची जीभ एक फुटापर्यंत लांब, बारीक व चिकट असते. जिभेचा वापर प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी खाण्यासाठी होतो. पाय आखूड असतात. प्रत्येक पायाला पाच बोटे असून त्यांच्यावर मोठ्या पण बोथट नख्या असतात. पुढच्या पायांवरील नख्या जास्त मोठ्या, लांब व वाकड्या असतात, याने जमीन वारूळे उकरण्यास मदत होते.

शरीरावरचे खवले हे या प्राण्यांचे खास वैशिष्ट्य आहे. ते केराटीन नावाच्या प्रथिनाने युक्त असतात. डोके, पाठ, अंगाच्या दोन्ही बाजू, पाय व शेपटी मोठ्या खवल्यांनी झाकलेले असतात. शरीरावरील खवल्यांची मांडणी घराच्या छपरावरील कौलांसारखी असते. खवल्यांच्या मधूनमधून केस बाहेर आलेले असतात. काही शास्त्रज्ञांच्या मताने केसांचे झुबके अतिशय कठीण आणि चापट होऊन खवले बनलेले असावेत. शरीराच्या पोटाच्या बाजूवर खवले नसतात, पण जाड व ताठ केस असतात. संकटाच्या वेळी डोके पोटात खुपसून, शरीर वाकवून आणि त्याचा खालचा भाग शेपटीने झाकून घेऊन ते अंगाची चेंडूसारखी घट्ट गुंडाळी करून स्वस्थ पडून राहतात. त्याचा गोल फुटबॉल सारखा आकार होतो.

खवल्या मांजर निशाचर आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात झोपलेले असते. शरीराचे वेटोळे करुन ते झोपते. बिळात शिरल्यावर ते बीळ बंद करून घेते. हे प्राणी आपल्या पुढच्या पायांवरील मोठ्या नख्यांनी खोल बिळे उकरतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतील मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात. चालताना पुढच्या पायांवरील बोटे वाकून तळव्याखाली आलेली असतात. मागच्या पायांचे तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले असतात. हे प्राणी हळूहळू व जमिनीचा वास घेत चालतात चालताना पाठीची कमान होते व शेपूट जमिनीपासून वर उचललेले असते कधीकधी आजूबाजूला नीट पाहता यावे म्हणून ते मागच्या पायांवर उभे राहतात. यांना झाडांवर चढता येते. या कामी आपल्या नख्या आणि पकड घेणारी शेपटी यांचा ते उपयोग करतात.

नर व मादी एकत्र राहतात. प्रजोत्पादनाचा काळ जानेवारी-मार्च असतो. मादीला दर खेपेला एकच (क्वचित दोन) पिल्लू होते. पिल्लांचे खवले जन्मत: मऊ असतात व नंतर ते कठीण होतात. मादी हिंडत असताना पिल्लू तिच्या शेपटीवर आडवे चिकटून बसते. संकटाच्या वेळी मादी पिल्लाला पोटाखाली झाकून घेऊन अंगाची गुंडाळी करते.

खवल्या मांजराचे पेंगोलिन हे इंग्रजी नाव ‘मलय’ शब्द पेंग्गुलिंगमधून आले आहे, ज्याचा अर्थ ‘जो गुंडाळी करतो’. खवल्या मांजरा विषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज लोकांमध्ये आहेत त्यातुनच सध्या जगभरात सगळ्यात जास्त प्रमाणात खवल्या मांजराची, त्याच्या खवल्यासाठी तस्करी होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या खवल्यांना मोठी किंमत मिळते. या गोष्टींमुळे खवल्या मांजर अत्यंत दुर्मिळ झाले असून ही प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भारतात या प्राण्याला कायदेशीर कवच दिले गेले आहे. लोकसहभागातून, जनजागृती मधून आपण सुंदर, अनमोल अशा खवल्या मांजराला नक्कीच वाचवू शकतो.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा