मुंबई, २ जुलै २०२३: अजित दादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक मोठे प्रस्थ आहे. त्यांनी आपल्या कार्यशैलीतून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सदैव गराडा त्यांच्या भोवती पाहायला मिळतो. त्यांच्या कामातून आजवर त्यांचा पक्ष संघटनेवरही पगडा दिसून आला आहे. नुकतीच त्यांनी आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अजितदादा यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना बाजूला करून अजितदादांकडे हे पद दिले जाणार का?
अजित दादा प्रदेशाध्यक्ष व्हावेत म्हणून त्यांच्या समर्थकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी सकाळीच अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या समर्थक आमदारांनी हजेरी लावली असून या आमदारांनी अजितदादांशी चर्चा सुरू केल्याचे समजते. धनंजय मुंडे, दौलत दरोडा, हसन मुश्रीफ, किरण लहामाटे, दिलीप वळसेपाटील आणि खासदार अमोल कोल्हे हे अजितदादा यांच्या देवगिरी या निवासस्थानी आले आहेत.
हे पाचही आमदार सकाळी सकाळीच अजितदादांच्या घरी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित आहेत. अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद द्यावे म्हणून हे आमदार लॉबिंग करत असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदलावरही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित दादांना मानणारा मोठा वर्ग राज्यभर पक्ष संघटनेमध्ये आहे. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी पक्षातील आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच आता जिल्हाध्यक्षही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लवकरच अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यपदाबाबतच चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी पक्षात नुकतीच भाकरी फिरवली. त्यात सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्षा आहेत. तर अजित पवार हे विरोधी पक्षनेते. एकाच घरात तीन तीन पदे आल्यासन विरोधकांच्या घराणेशाहीच्या आरोपाला बळकटी मिळेल. त्यामुळे आता अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद शरद पवार देणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर