नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाणार? काँग्रेसचे नाराज सदस्य भाजपच्या संपर्कात

नागपूर, २२ जुलै २०२३ : राज्यात सत्ता परिवर्तन होऊन शिवसेना भाजपचे सरकार सत्तेवर आले. आता राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाला आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होणार असल्याचा दावा, खुद्द नागपूर जिल्हा परिषदेतील भाजपचे विरोधीपक्ष नेते सतीश उमरे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नाराज सदस्यांचा गट भाजपच्या संपर्कात आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. लवकरच नागपूर जिल्हा परिषदेत सत्तापालट होईल, असा दावा खुद्द भाजपचे विरोधीपक्ष नेते उमरे यांनी केला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांचे वर्चस्व आहे. त्यांचाच गट सध्या सत्तेत आहे. पण त्यांच्या गटातही पदाधिकाऱ्यांवरील नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्येही भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील, जिल्हा परिषदेत सत्ता बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेतील एकूण ५८ सदस्यांपैकी काँग्रेसचे ३२, भाजपचे १४, राष्ट्रवादीचे ८ सदस्य आहेत. शिवसेना (शिंदे गट), शेकाप, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष असे चार सदस्य आहेत. भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी १५ सदस्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.सुनील केदार यांनी संघटन मजबूत करून जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आणली. नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे भाजपचे दिग्गज नेते आहेत. तरीही जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे भाजप सत्ता परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा