पुणे, १५ जुलै २०२३: दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गुगलच्या अँड्रॉइड अॅप प्रकरणी, अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपीलांवर सर्वोच्च न्यायालय १० ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी करणार आहे. या प्रकरणी गुगल आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) दाखल केलेल्या अपीलांवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित पैलूंवर विचार करण्यासाठी काही वेळ हवा आहे. यावर वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांनी एका पक्षाची बाजू मांडताना, ही याचिका नंतर अंतिम निकालासाठी ठेवली जाऊ शकते, असे सांगितले.
त्यानंतर न्यायालयाने सांगितले की, दोन्ही अपील १० ऑक्टोबर रोजी अंतिम निकालासाठी सूचीबद्ध केले जाऊ शकतात आणि संबंधित पक्षांनी ७ ऑक्टोबरपर्यंत त्यांचे युक्तिवाद दाखल करावेत. यासह दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या मदतीने समान डिजिटल युक्तिवाद तयार करण्यासाठी न्यायालयाने वकील समीर बन्सल यांना नोडल वकील म्हणून नियुक्त केले.
२९ मार्च रोजी, राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) ने या प्रकरणात Google च्या कथित स्पर्धा विरोधी पद्धतींवर निर्णय दिला होता. त्यात, न्यायाधिकरणाने गुगलला लावलेला १,३३८ कोटी रुपयांचा दंड कायम ठेवला परंतु त्याच्या प्लेस्टोअरवरील इतर अॅप स्टोअरला मान्यता देण्यासारख्या अटी काढून टाकल्या. अँड्रॉइड मोबाइल इकोसिस्टममधील आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल सीसीआयने गुगलवर हा दंड ठोठावला आहे. याशिवाय, गुगल वापरकर्त्यांना मोबाइलवर प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स काढून टाकण्यास मनाई करणार नाही, असे स्पर्धा आयोगाने म्हटले होते.
एनसीएलएटीच्या त्या आदेशाविरुद्ध गुगल आणि सीसीआय या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी, सीसीआय ने अँड्रॉइड मोबाइल उपकरणांच्या संदर्भात, स्पर्धाविरोधी पद्धती अवलंबल्याबद्दल गुगल वर १,३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयाला एनसीएलएटीसमोर आव्हान देण्यात आले, तेथून गुगलला अंशतः दिलासा मिळाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड