मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पुन्हा पेटणार?

मुंबई, दि. ११ सप्टेंबर २०२०: ९ सप्टेंबरला देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली. मराठा समाजाला मोठा धक्का देणारा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा पुन्हा पेट घेताना दिसतोय.

कोर्टाच्या या निर्णयामुळे सकल मराठा समाजात महाराष्ट्राच्या महविकास आघाडी सरकारविरुद्ध तीव्र नाराजी दिसून आली. त्याचे पडसाद सोलापूर, पंढरपूर, बीड, जालना अशा अनेक जिल्ह्यांत दिसून आले. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी टायर्स जाळली, आंदोलने केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली नाराजी व्यक्त केली.

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही या निर्णयामुळे आपला संताप व्यक्त केलाय. “मराठा समाजाचा घात करणाऱ्या वर्तमान किंवा भूतकाळातील कोणतंही सरकार असो, त्यांना याची किंमत मोजावी लागेल” असं संभाजीराजे फेसबुकवर म्हणाले.
दुसरीकडे पूर्वी सत्तेत आणि आता विरोधी पक्षात असलेल्या भाजपनेही सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत दादा पाटील, विनायक मेटे यांसारख्या अनेक भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात मराठा आरक्षण लागू करता येणार नाही. सध्या हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आलं आहे.

कोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत “सरकारनं अध्यादेश काढावा” आणि “पुनर्विचार याचिका दाखल करावी” असं म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं बोललं आहे. मात्र या सगळ्यात मराठा समाजाचा घात झाल्याची भावना व्यक्त होतेय.

घटनेनुसार एकूण आरक्षण ५०% पेक्षा जास्त नसावं अशी तरतूद आहे. मात्र २०१९ साली संसदेत ठराव मंजूर करून आणखी १०% आर्थिक आरक्षण मंजूर करण्यात आलं. देशाच्या अनेक राज्यांमध्ये ५०% पेक्षा जास्त आरक्षण आहे. तरीही महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या बाबतीत आलेला हा निर्णय निराशाजनक असल्याचं मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

देशात सध्या कोरोना, ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी अशी अनेक संकटं आहेत. राज्यातही परिस्थिती भयंकर आहे. अशा स्थितीत सुशांत सिंह राजपूत केस, कंगना राणावत प्रकरण यांसारख्या मुद्द्यांनी मराठा समाजाचा आवाज हा माध्यमांमध्ये दबलेला दिसतो. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मराठा समाज पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात असल्याचं दिसतंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा