मुंबई पोलिसांची बदनामी करणारे मराठी भैय्ये आता माफी मागतील का ?: जितेंद्र आव्हाड

मुंबई, ५ ऑक्टोंबर २०२०: एम्स’नं सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाबाबत मोठा खुलासा करत असं म्हटलं की सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्याच केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात वक्तव्यांचा भडीमार होण्यास सुरुवात झाली. या प्रकरणावरून भाजपनं ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मुंबई पोलिसांवर देखील या प्रकरणी आरोप केले होते. मात्र, त्यांच्या अहवालानंतर सुशांतनं आत्महत्या केली व त्याची हत्या झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत प्रकरणावरून राज्य सरकारची व मुंबई पोलिसांची बदनामी करणारे मराठी भैय्ये आता माफी मागतील का? असा खोचक सवाल त्यांनी केलाय.

‘सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआय’नं मान्य केलं आहे की, सुशांतनं आत्महत्या केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ आता माफी मागणार का’, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजप वर टीका केली आहे. ते म्हणाले की, सुशांतप्रकरणाचा तपास पोलीस चांगला करत होते. त्याच्या आत्महत्येचं कारणही पोलिसांना माहीत होतं. शवविच्छेदन अहवालात सर्व नमूद होतं. पण, मृत्यूनंतर कुणाचं चारित्र्यहनन नको म्हणून पोलीस काही बोलत नव्हते. आम्हीही मृत्यूनंतर कुणाची बदनामी नको म्हणून बोललो नाही. मात्र, सीबीआय’कडं तपास गेल्यानंतर ड्रग्स आणि चरस सर्व काही बाहेर आलं. आता तर एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. एम्स’चे डॉक्टर हे काही शिवसैनिक नाहीत, असं सांगतानाच सुशांतप्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भरपूर प्रयत्न झाला. त्यांचं हे षडयंत्र उधळलं गेलं. आमच्यासाठी खड्डा खोदणारे स्वत: खड्ड्यात पडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा