पुणे, ८ डिसेंबर २०२२ : पुण्यात डिसेंबर आणि जानेवारीच्या दर रविवारी लांबपल्ल्याच्या अंतराचे धावण्याचे आव्हान असते. धावण्याच्या माध्यमातून सुदृढतेची आवड शहरात झपाट्याने वाढली आहे. फिटनेस क्लब आणि संस्थांद्वारे आयोजित लांबपल्ल्याच्या धावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात चालत आहेत. सहभागी ३ कि.मी ते ४२ कि.मी.पर्यंतचे अंतर निवडू शकतात. अल्ट्रा, नाईट, व्हर्च्युअल, किड्स आणि माउंटन ट्रेलपासून ते प्रोफेशनल हाफ आणि फूल मॅरेथॉनपर्यंत, लांबपल्ल्याच्या धावांना उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे या कार्यक्रमाच्या आयोजकांचे म्हणणे आहे.
शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात धावणारे गट त्यांचे प्रशिक्षण काही महिने अगोदरपासून सुरू करतात आणि विनाखर्च फिटनेस अॅक्टिव्हीटीमध्ये सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग असतो. इंटरनेटवरील काही कार्यक्रम नोंदणी वेबसाइट्सवर नजर टाकल्यास असे दिसून आले, की ११ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या गटांद्वारे २० लांबपल्ल्याच्या धावांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महिन्यात बहुतेक ५० तरी धावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन असते. अनेक फिटनेसप्रेमींनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, या उपक्रमात सहभागी होणार असल्याचेही सांगितले आहे.
दोन मुलांची आई असलेली मॅरेथॉनपटू तृप्ती गुप्ता यांनी २०१८ मध्ये हौशी म्हणून धावण्याचा प्रवास सुरू केला होता; पण आता त्या व्यावसायिक पातळीवर पोचल्या आहेत. त्यांनी तीन पूर्ण मॅरेथॉन स्पर्धांत भाग घेतला होता. जानेवारीत दिल्ली मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे आणि जागतिक मास्टर्सचीही त्या वाट पाहत आहेत. श्रीमती गुप्ता म्हणाल्या, की धावणे हा फिटनेसचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे; परंतु त्यासोबत सामाजिकीकरण आणि प्रवासाचे घटक देखील आहेत. जेव्हा मी दररोज धावत असते तेव्हा लोक मला सांगतात, की त्यांना ते प्रेरणादायी वाटतं. त्या म्हणाल्या, क्षेत्रानुसार ३ कि.मी. धावा लोकप्रिय आहेत. ५ कि.मी. आणि १० कि.मी. धावण्यामध्ये उत्साही लोक मजा आणि फिटनेससाठी भाग घेतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे