भारताने रशियाकडून केली ही मागणी, पुतिन करणार का मान्य?

नवी दिल्ली, 6 मे 2022: युक्रेनवरील हल्ल्यामुळं पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा सामना करत असलेल्या रशियाकडून तेल खरेदीवर अधिक शिथिलता आणण्याची मागणी भारत करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत रशियाकडून प्रति बॅरल $70 पेक्षा कमी दराने कच्चे तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 डॉलर इतकी आहे.

सूत्रांनी ब्लूमबर्गला सांगितलं की, कच्च्या तेलाच्या खरेदीत येणाऱ्या अडचणींची भरपाई करण्यासाठी सवलतीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, भारत सरकारने या अहवालावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून भारताच्या सरकारी आणि खाजगी तेल शुद्धीकरण कारखान्यांनी रशियाकडून 40 दशलक्ष बॅरलहून अधिक कच्चं तेल सवलतीत विकत घेतल्याचे अहवालात म्हटलं आहे. व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीचा हवाला देत ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटलंय की, 2021 मध्ये रशिया आणि भारत यांच्यातील कच्च्या तेलाच्या एकूण खरेदीपेक्षा हे प्रमाण 20 टक्के अधिक आहे.

गेल्या महिन्यातही रशियाने भारताला 15 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाच्या एकवेळच्या खरेदीवर सवलत देऊ केली होती. अमेरिका आणि युरोपियन युनियनसह पाश्चात्य देशांनीही या खरेदीवर भाष्य केलं, मात्र भारत सरकारने यावर प्रतिक्रिया देत युरोपियन युनियननेही रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली असून देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताने या प्रस्तावाचं स्वागत केलं.

त्याच वेळी, युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी बुधवारी युरोपियन संसदेत रशियाचे तेलावरील अवलंबित्व पूर्णपणे काढून टाकण्याच्या प्रस्तावाबद्दल सांगितलं.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन वापरणारा देश असल्याचा अंदाज आहे. भारत दररोज सुमारे 5 दशलक्ष बॅरल तेल वापरतो आणि भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो, परंतु यामध्ये रशियन तेलाचा वाटा अत्यल्प आहे. S&P ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सच्या अंदाजानुसार 2021 मध्ये ते तीन टक्क्यांपेक्षा कमी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा