द्राक्ष बागायतदारांच्या मदतीसाठी विधानसभेत मुद्दा मांडणार: यशवंत माने

इंदापूर, दि. २८ एप्रिल २०२०:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सर्वात जास्त शेती व्यवसायाला बसला असून यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर द्राक्ष पिके मातीमोल झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.

तोडायला आलेली द्राक्ष बागेतच सडुन जात आहेत किंवा वाहतूक खर्चात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढणार आहे. यामुळे शासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करून विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माने म्हणाले की द्राक्षांपासून वाईन, मनुके, पल्प मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मात्र कारखाने बंद असल्याने वाईन निर्मितीला जाणारी द्राक्षे बंद झाली तर शेतकऱ्यांकडे बेदाणे बनवण्यासाठी लागणारे शेड उपलब्ध नसल्याने ओली द्राक्ष बागेतच सडत आहे. तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी वाहतुक खर्चात द्राक्ष घरपोच विकण्याचा फंडा काढला आहे. बुडत्याला काडीचा आधार अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. इंदापूर आणि मोहोळ तालुक्यात मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात बोरी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. यावर्षी तालुक्यात दोन हजार पाचशे हेक्टर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. केळी एक हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. द्राक्ष बागायतदारांना एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो तर केळी बागायतदारांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला खर्च वाया गेला आहे या बरोबरच एक वर्ष केलेले कष्ट आणि विज बिल भरावे लागणार असल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. तालुक्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या पाण्यावर द्राक्ष पिक घेतले आहे. यामुळे कर्जाचा बोजा वाढणार आहे. या विवंचनेत शेतकरी असल्याने शासनाला मदत करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पाउस, हवामानातील बदल, बाजार भावाचा चढ उतार सहन करावा लागत असतानाच आता कोरोनाच्या संकटाने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादनात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. राज्यातील नाशिक पाठोपाठ इंदापूरचे व मोहोळ तालुक्यातील शेतकरी अधिकची द्राक्ष उत्पादित करत आहेत. मात्र वेळोवेळी येणाऱ्या संकटाने द्राक्ष बागायतदार पुरता कोलमडला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा