मुंबई, दि. २२ जुलै २०२०: विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून युजीसी आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेला वाद आता टोकाला पोहचला आहे. संपूर्ण देशातून या निर्णयाचा निषेध केला जातोय. मात्र तरी देखील युजीसी आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे. यामुळेच कोरोनाच्या परिस्थितीत परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेसतर्फे नुकतेच कल्याणच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
सध्याच्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. आजच्या घडीला असे कोणतेही क्षेत्र किंवा व्यक्ती नाही. जिकडे कोरोनाने शिरकाव केलेला नाहीये. या पार्श्वभूमीवर परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ब्रिज दत्त, सचिव गायत्री सेन, कल्याण जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मनिष देसले, सरचिटणीस प्रसन्न ताकपेरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनीधी: राजश्री वाघमारे