भगवानगडाची साथ तरी धनंजय मुंडेंना वाचवेल का? विरोधकांचा हल्लाबोल!

6

बीड १ फेब्रुवारी २०२५ : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खंडणी आणि हत्या प्रकरणात गंभीर आरोप होत असतानाच भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी त्यांची जाहीर पाठराखण केली आहे. “धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे,” असे वक्तव्य करताच महंतांवर चौफेर टीका सुरू झाली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महंतांना सुनावत, “गड कोणालाही पाठीशी घालू शकत नाही. महंतांकडे जाऊन पाप लपत नाही,” असा घणाघात केला.

गुरुवारी रात्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर महंत शास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारी महंतांनी पत्रकार परिषद घेऊन मुंडेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे संतापाचा भडका उडाला. “संतोष देशमुख यांनी आरोपींना आधी चापट मारली होती, त्यामुळेच ही घटना घडली,” असे महंतांनी म्हटल्याने देशमुख कुटुंबीय आणि अनेक राजकीय नेते आक्रमक झाले आहेत.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी “धनंजय मुंडेंना भगवानगडाचा आधार का घ्यावा लागतो? पक्षाने त्यांना सोडून दिले आहे का?” असा सवाल उपस्थित केला. तर जितेंद्र आव्हाड यांनी, “गादीला द्वेष आणि सूडाच्या विरोधात बोलायला हवे. महंतांनी चुकीची भूमिका घेतली,” अशी टीका केली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. आता या वादळात मुंडेंना भगवानगडाची साथ पुरेशी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा