पुणे, १८ फेब्रुवरी २०२१: मागच्या काही काळात पुण्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव कमी होताना दिसला होता. मात्र, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तसेच आता शहरातील प्रमुख पेठा देखील गर्दीने गजबजलेल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर या गोष्टींकडे पुणेकर सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा मास्क न घातलेल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना चा एकूणच प्रादुर्भाव वाढताना पाहता पुण्यामध्ये पुन्हा लॉक डाऊन होणार का? हा प्रश्न आता उभा राहिला आहे. यावर स्पष्टीकरण देत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुण्यात संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे मात्र, तातडीचे लॉक डाऊन हा लगेच घेतला जाणारा पर्याय असू शकत नाही. पुणेकरांना सध्या लॉक डाऊनला सामोरे जावे लागणार नाही मात्र त्याबाबत खबरदारी घेण्याचे आव्हान त्यांनी पुणेकरांना केले आहे.
मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा ४.६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता १२.५ टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काल तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मोहोळ यांनी ट्विटवरुन म्हटले आहे. रुग्ण संख्या वाढत राहिल्यास भविष्यात काही निर्बंध घालावे लागतील असेही मोहोळ यांनी सांगितले आहे.
त्याप्रमाणे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १३०० पर्यंत आली होती ती आता १७०० पर्यंत जाताना दिसत आहे. संपूर्ण शहरातील सर्व भागात रुग्ण वाढत आहेत अशीही स्थिती नाहीय. एकूण शहरातील महानगरपालिकेचे चार वॉर्ड ऑफिस आहेत त्यापैकी चार वॉर्ड ऑफिसमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये सिंहगड रोड, वारजे, विबेवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि नगर रोड क्षेत्रीय कार्यालय परिसर आहे. या चार वॉर्डच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढताना दिसतेय असंही मोहोळ यांनी सांगितलं आहे.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१
◆ उपचार सुरु : १,८८१
◆ नवे रुग्ण : ४२८ (१,९५,९२४)
◆ डिस्चार्ज : २६२ (१,८९,२३७)
◆ चाचण्या : ४,३०४ (१०,८१,११५)
◆ मृत्यू : ४ (४,८०६)
नव्याने ४ मृत्युंची नोंद !
पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ८०६ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार ८८१ रुग्णांपैकी १४५ रुग्ण गंभीर तर २९० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे