5 ऑक्टोबर 2019. शनिवारची संध्याकाळ. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. पण याबाबत कुठलीच ठोस माहिती मिळत नसल्याने दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली.
सालाबादप्रमाणे राहुल गांधी बँकॉकला सुट्टीवर गेल्याची शक्यता असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसला चिमटा काढताना ट्विटरवर बँकॉक का ट्रेंड होत आहे? असा प्रश्न विचारणारं ट्विट केलं.
भाजपच्या या ट्वीटला काँग्रेसनं तब्बल 12 तासानंतर ट्वीट करून करून स्पष्टीकरण दिलं.
- नेहरू-गांधी कुटुंब काँग्रेससाठी ओझंही आणि संपत्तीही
- अनेक तासांच्या चर्चेनंतर सोनिया गांधी झाल्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष
- आधीच खिळखिळी झालेली काँग्रेस काश्मीर मुद्द्यामुळे विखुरली का?
काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी रविवारी सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी ट्विट करून सांगितलं, “कोणाच्याही वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्याची सरमिसळ करता कामा नये. प्रत्येकाचं खासगी आयुष्य आणि स्वातंत्र्य यांची जाणीव आपल्याला असायला हवी. हीच तर पुरोगामी आणि उदारमतवादी लोकशाहीची मूलभूत ओळख आहे.”
सिंघवी यांनी हे ट्वीट करताना राहुल गांधी आणि बँकॉक असे दोन हॅशटॅग वापरले. त्यामुळे राहुल गांधी बँकॉकला गेले असल्याच्या वृत्ताला पुष्टीच मिळाली असल्याचं बोललं गेलं.
राहुल गांधींचा अज्ञातवास नवा नाही
राहुल गांधींचं असं अचानक परदेशदौऱ्यावर जाणं हे नवं नाही. यापूर्वीही 2015, 2016 तसंच 2018 मध्येही राहुल गांधी अचानक परदेशी निघून गेले होते. ते जिथं जातात त्या ठिकाणांची माहिती देत नसल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झालेली आहे.