गोल पोस्ट इतर राजकारण शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपावण्याचा प्रयत्न करतो, अजित पवार- शरद पवार...

शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपावण्याचा प्रयत्न करतो, अजित पवार- शरद पवार भेटीवर जयंत पाटील यांचे वक्तव्य

सांगली, १४ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समोर आले नाही. तर, घरातील वडीलधाऱ्या माणसांना भेटण्यासाठी कुणीही येऊ शकते, अजित पवार माझा पुतण्या आहे असे सांगत नवी राजकीय गुगली पवारांनी टाकली आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलताना यावर वक्तव्य केले आहे.

आतताईपणाने कोणती पावले न टाकता सामंजस्याने जर काही होत असेल तर प्रयत्न करायचा,असे जयंत पाटील यांनी शरद पवार, अजित पवार यांच्या भेटीबाबत भाष्य केले आहे. पण आता प्रयत्नापेक्षा काम पुढे गेले आहे. त्यामुळे मी प्रयत्न करून बघितला, पंरतु त्या प्रयत्नाचे काही उत्तर मिळेल याचे आज तरी आम्हाला काही वाटत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे जो काही निर्णय होईल तो होईल. लढाई सुरु झाली आहे जे व्हायचे आहे ते होणार आहेच. राजकारणात बेरजेचे राजकारण करायचे असते. भागाकर आणि वजाबाकी होऊ नये याचा प्रयत्न कोणत्याही पक्ष्याच्या अध्यक्षांनी करायचा असतो. मी तेच केले असे पाटील म्हणाले. कोणीही शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपावण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे मी प्रयत्न केले असे ते म्हणाले.

ठाण्यात जी घटना घडली ती अतिशय गंभीर अशी घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातच हॉस्पिटलची यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात दवाखान्याबद्दल मोठे मोठे पोस्टर लावले.आपला दवाखाना घोषणा केल्या. पण, त्याआधी त्यांनी आपल्या शहरातील आपला दवाखाना बघायला पाहिजे होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी आधी ठाणे शहरातील दवाखाने सुधारले पाहिजेत. अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करणे आणि विनाकारण बोलणे मला व्यक्तिशः चुकीचे वाटते. निवडणूका जवळ आल्या आहेत. महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्यांनी अनेकांना कामे वाटून दिली आहेत. जेणेकरून जाती-जातीमध्ये संघर्ष निर्माण व्हावा असा अनेकांचा प्रयत्न दिसत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version