‘युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीद’ हे घोषवाक्य म्हणत, पुणे झाले जगातील शंभर अग्रेसर शहरांच्या गटात सामील.

6

पुणे, २१ ऑक्टोबर २०२२ : पुणे शहरातील वायू प्रदुषणाच्या समस्येवर उपाय योजनेंतर्गत उत्सर्जन कमी करणे, हवेची गुणवत्ता वाढण्यासाठी उपाययोजना करणे आणि त्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करणे या निकषांवर पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर पुणे शहराचा गौरव करण्यात आला आहे.

पुणे शहराने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. वायू प्रदुषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक ई-बसेसचा समावेश करत शहराचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांची दखल जागतिक पातळीवरील जवळपास १०० अग्रेसर शहरांच्या समूहाने घेतली असून ‘युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीद’ या गटात पुणे शहराची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

जागतिक हवामान बदलाच्या समस्यांवर उपाययोजना करणाऱ्या जगातील १०० अग्रेसर शहरांचा ‘सी-४०’ हा समूह कार्यरत आहे. या समुहाने अर्जेंटिना देशातील ब्यूनास आयरेस शहरात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहराच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करुन, पुण्याला ‘सी-४०’ सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अ‍ॅवार्डस’ चे विजेते म्हणून जाहीर केले आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे या कार्यक्रमास ऑनलाईनरित्या उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेने पीएमपीएमएलच्या ताफ्यात जास्तीत जास्त ई-बसेस समाविष्ट करण्यावर भर दिला आहे. ई-बसेसच्या वापराचे विविध फायदे असून सर्व बसेसच्या आयुर्मान कालावधीत पेट्रोल व डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.शहरात ईलेक्ट्रिक बसेसमुळे उत्सर्जन कमी होण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यात मदत होत आहे. ई-बसेसचा आमचा हा उपक्रम इतर शहरांनाही मार्गदर्शक आणि प्रेरक ठरु शकेल अशा स्वरुपाचे मॉडेल तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा