दिल्ली १२ सप्टेंबर २०२२ : केंद्र सरकार नवीन कामगार संहिता आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार, आता प्रत्येक राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये केवळ चार दिवस काम करावे लागणार आहे. म्हणजे, आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.
मात्र, असे झाले तरी त्या चार दिवसात तुम्हाला बारा तास काम करावे लागेल म्हणजे आठवड्याचे ४८ तास पूर्ण करावे लागतील. याबरोबरच स्त्री-पुरुष वेतन समानता हा महत्त्वाचा निर्णय या मार्गाने होणार आहे. कामाच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांना समान वेतन असावे ही एक वाजवी अपेक्षा ठेवण्यात येते. तीच पूर्ण करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
आधी वर्षांतून २४० दिवस काम करणे अनिवार्य होते. आता यामध्ये देखील मोठा बदल करण्यात येणार असून, वर्षातून केवळ १८० दिवस कामाचे तास भरलेले असावेत ही अट ठेवण्यात येणार आहे. नवीन वेतन संहितेनुसार, तुमची टेक होम सॅलरी म्हणजे तुम्ही जो पगार घरी घेऊन जाता तो हातात येणारा पगार कमी होणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगाराच्या (CTC) ५० टक्के किंवा त्याहून अधिक असावा, अशी तरतूद सरकारने नव्या नियमात केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जास्त आहे, त्यांच्या पीएफ मध्ये वाढ होणार आहे.
तुमच्या निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे भली मोठी रक्कम असावी, याची तरतूद याद्वारे केंद्र सरकार करत आहे. प्रत्येक राज्याने हा निर्णय लागू करावा यासाठी केंद्र प्रयत्नशील असणार आहे. याबाबत नेमकी तारीख कळलेली नसली तरी, येत्या काळात याची अंमलबजावणी होणार हे नक्की !
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड