केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

पुणे, दि. २२ जून २०२० : गेल्या काही दिवसात पुण्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. अवघ्या तीन दिवसामध्ये दहा जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. अशातच पुन्हा एक नवीन घटना समोर आली आहे. पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून एका ३६ वर्षीय महिलेने उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेच्या १३ वर्षीय मुलावर केएम रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते.

संबंधित महिला पुण्यातील वानवडी या भागामध्ये राहणारी होती. सोमवारी सकाळच्या वेळी केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन या महिलेने उडी मारली होती. या महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप उघड झालेले नाही. याच ठिकाणी या महिलेच्या १३ वर्षीय मुलावर उपचार चालू होते. त्यामुळे तिच्या मृत्यूवरून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच

१९ जूनला पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तिशीतील दाम्पत्याने दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर स्वतःचेही आयुष्य संपवले होते. आर्थिक चणचण असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

त्याच दिवशी सिंहगड रोडवरील एका मंडप व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रविवारी रास्ता पेठेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या पतीने आत्महत्या केली, हा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही त्याच हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा