महिला दिन…केवळ एक दिवसाचा आदर

आज जागतिक “महिला दिन” माझ्या सन्मानार्थ ठेवलेला एक विशेष दिवस. संपूर्ण जगभरात आजच्या दिवशी आमचे कौतुक केले जातात. कार्यक्रम ठेवले जाते. पण, हा दृष्टिकोन फक्त एका दिवसापुरताच त्यानंतर काय?

लहान होते हसण्याचे बागडण्याचे वय,सतत हसतं खेळत राहयचे, माझ्या बाजूचे आजोबा ही माझे फार लाड करायचे, नेहमी मला आपल्या मांडीवर बसवायचे. एक दिवस त्यांची मांडी मला नकोशी वाटली आणि त्यांच्या दृष्टीतून मी स्वतःला पाहण्याची हिम्मत केली. पण, ती आजोबांची दृष्टी नव्हतीच……..

शाळेत मित्र, मैत्रिणींचा सहवास एक वेगळं विश्व होतं माझं. दंगा, धमाल मस्ती, आभ्यास हे निराळं जगच जणू माझं, पण वर्गात सरांचा तास अजिबात आवडायचा नाही. मला त्यांच्या त्या तासात त्यांची दृष्टी ही वर्गातील कुणावर नसून फक्त माझ्यावर आसयची……

म्हणतात काॅलेज बरेच आयुष्याचे नवे धडे शिकवून जाते, पण इथले माझे मित्र हे शाळेतल्या मित्रांसारखे नव्हते. त्यांची नजर सतत माझ्या वेगवेगळ्या अवयवांवर आसायची. माझ्या मागे ते चर्चा ही करायचे, त्यांच्या दृष्टीने हि बरेच शिकवले मला…….

चांगले काम लागले पण ऑफिसमधल्या बाॅसचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र मला कळला….

मी कसे कपडे घालते आणि रस्त्यावर कशी वावरते यावरूनही मला समाजाची दृष्टी कळली…..

माझ्यावर बलात्कार झाला तरी देखील आपल्या देशातील नेत्यांनी माझ्यावरच आरोप केले…. मुलगा पसंत नसताना ही त्या मुलाबरोबर लग्न लावून दिले तो समाज मान्य बलात्कार माझ्यावर झालाच…..

या सगळ्या दृष्टिकोनातून मी सहज जाते. कारण आम्हा स्त्रियांना तर राम काळापासूनच खलनायिका ठरवलं आहे. पण रामायण, महाभारताला ही “स्री” कारणीभूत? पण काळ बदलत गेला. आम्ही बंधनं तोडून पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ही झालो पण या समाजाचा दृष्टीकोन मात्र बदलला नाही. आजही मुखवटे घालून मिरवतात आणि एक दिवस आमचे गोडवे गातात आणि त्यांनंतर मात्र तीच दृष्टी कायम ठेवतात…….

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा