मुंबई, २६ ऑगस्ट २०२० : कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सेस आणि देखरेख खर्च कमी करण्याच्या तसंच याबाबतचे कायदे सुटसुटीत करण्याच्या मागणीसाठी काल राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं काम बंद ठेवण्यात आलं होतं. या एकदिवसीय लाक्षणिक बंदमधून भाजीपाला आणि फळं आणि कांदा बटाटा बाजार मात्र वगळण्यात आले. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचपैकी धान्य आणि मसाला मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
राज्य सरकार बाजार समित्यांबाहेरील व्यापा-यांना कोणताही कर लावत नसताना समितीमध्ये मात्र १ टक्का सेस वसूल करीत आहे. परिणामी जादा दराने अन्नधान्य विकावे लागत आहे. याचा परिणाम विक्रीवर झाला असून समितीमध्ये माल खरेदीसाठी येणारी संख्या रोडावली आहे. त्यामुळे हा सेस रद्द करावा, या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला.
सांगली मार्केट यार्डातही व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पाळला. या बंदमध्ये यार्डातील व्यापारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. लाखो रुपयांची उलाढाल त्यामुळे ठप्प झाली. अन्य राज्यांनी कायद्यामध्ये बदल केला आहे मात्र राज्य सरकारने या कायद्यामध्ये बदल केलेला नाही याबद्दल व्यापाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे.
राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम या कार्यक्रमांतर्गत चिंचविहीरे आणि कनगर गावातील काही शेततळे धारक शेतकऱ्यांना मत्स्य बीज वाटप काल करण्यात आलं. पाण्याच्या शाश्वतीसोबत शेततळ्यात मत्स्यशेतीचा समावेश केला तर शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि त्यांची आर्थिक क्षमता देखील वाढण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी
